नवी दिल्ली:- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याबद्दल काही लोकांनी तीव्र आक्षेप घेतला आहेत. या वादावर खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली आहे. त्यांनी म्हटले की, बेशरम रंग गाण्यात आक्षेपार्ह आणि दुखावणारे दृश्य असेल तर ते एडिट करून पुन्हा प्रदर्शित करावे.
खासदार नवनीत राणा म्हणतात की,भगव्या रंगाच्या बिकीनवरील वादावर प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “मला असे वाटते की ज्या रंगाचा गैरवापर चित्रपटात केला गेला असेल आणि त्यामुळे जर आपल्या देशातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर सर्वप्रथम सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहायला हवा. जर कुठेही असे काही आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारे दृश्य असेल तर त्याला एडिट करुन पुन्हा प्रदर्शित करायला हवे.
एखाद्या चित्रपटाला किंवा इतर कोणत्याही गोष्टीला बॉयकॉट करण्यापेक्षा आक्षेपार्ह किंवा भावना दुखावणारे दृश्य असतील तर सेन्सॉरने ते पाहायला हवे. त्यानंतर त्यात एडिट करुनच ते प्रदर्शित करायला हवे. कारण शेवटी सिनेसृष्टीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यामुळे देशाला आर्थिकरित्या आधार मिळतो. मी या गोष्टींचा सकारात्मकरित्याच विचार करते. देशभरातील कलाकारांच्या चित्रपटांना बॉयकॉट करु नये. कारण त्यांचा आपल्या देशातील आर्थिक जडणघडणीत फार मोठा वाटा आहे”, असे त्या म्हणाल्या आहेत.