पुणे : ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं सुरुवातीपासूनच वादात सापडले आहे. गाण्यामधील वेशभूषा आणि त्याचे चित्रीकरण जितके वाइट पद्धतीने चित्रित करण्यात आले आहे, त्याहिपेक्षा या गाण्यातील अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीमुळे हे गाणे अधिक चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे आता केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी बिकीनीला नव्हे तर गाण्यातील ‘बेशरम रंग’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे.
रामदास आठवले यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पठाण सिनेमाला विरोध नाही. मात्र भगवा रंग जसा भाजप, शिवसेनेचा आहे, तसाच तो आमचा पण रंग आहे. कारण गौतम बुद्ध हे देखील भगवा रंग परिधान करायचे. त्यामुळे गाण्यातील बेशरम शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. बेशरम शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करू, असा इशारा आठवले यांनी दिला.
त्याचबरोबर यावेळी रामदास आठवले यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील हे एक मोठे नेते आहेत, पण त्यांच्या वक्तव्याशी कोणीही सहमत नाही. लोकसहभागातून बाबासाहेबांनी हे काम केलंय. भीक हा शब्द योग्य नाही. पण त्यांनी आता माफी मागितली. त्यांच्यावर शाई फेक करणाऱ्यांवर ३०७ कलम लावण्यात आले होते. त्याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो. हे कलम देखील हटवण्यात आले आहे. आता हे प्रकरण थांबायला हवे असं आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकासआघाडीचा कालचा मोर्चा फार काही मोठा नव्हता. आम्ही असे अनेक विराट मोर्चे काढलेले असल्याचे मविआच्या वतीनं काढण्यात आलेल्या महामोर्चावर ही प्रतिक्रिया दिली आहे. मात्र महापुरुषांबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही, याबाबत राज्यपालांबाबत आम्ही उघड नाराजी व्यक्त केलेली आहे, असे देखील आठवले यांनी म्हटले आहे.