मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कंट्रोल रुमच्या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे आली होती.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माणसं मोदींची हत्या करतील असे मेसेज समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या. पोलिसांच्या गुन्हे शाखेने संदेश पाठवणाऱ्या तरुणाची ओळख पटवली असून, हा व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांपासून हे मेसेज पाठवले जात होते. यात १९ ऑडिओ क्लिप आणि २० मेसेज पाठवले गेले होते. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांच्या गुन्हे शाखेने संदेश पाठवणाऱ्या तरुणाची ओळख पटवली असून, हे मेसेजेस आणि ऑडिओ क्लिप फसव्या निघाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मेसेज पाठवणाऱ्या या व्यक्तीचे ठिकाण पश्चिम बंगालमध्ये असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्या व्यक्तीने एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचे बिझनेस कार्ड आणि आधार कार्ड यासह इतर गोष्टी या व्हॉट्सएप नंबरवर पाठवल्या होत्या. यानंतर पोलीस यंत्रणेने तपास केला असता ही माहिती समोर आली.
संशयित केरळमध्ये सोन्याचे दागिने बनवण्याचे युनिट आणि शोरूममध्ये काम करत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याच्या दुसर्या भावाशीही संपर्क साधला असल्याची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आमच्या सूत्रांद्वारे आम्हाला कळले की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.