सोलापूर : वाराणसी आणि तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचे कॉरिडॉर होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विकास आराखडा तयार केला आहे.मात्र या आराखड्यामुळे हजारो लोक बेघर होतील या पार्श्वभूमीवर पंढरपूर कॉरीडॉर रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलने सुरु आहेत. त्यातच मागणी मान्य न झाल्यास भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.तर काहीजणांकडून पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची मागणी झाल्यामुळे मनसेकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कॉरिडॉर आणि विकास आराखड्यामुळे हजारो लोक बेघर होणार आहेत. जुने पुरातन वाडे नष्ट होणार आहेत. जबरदस्तीने हा कॉरीडर राबवला जात आहे.त्यामुळे पंढरपूर कॉरीडॉर रद्द करावा ही मागणी जोर धरु लागली आहे. या पंढरपूरच्या विकास आराखड्याला पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसर बचाव समितीने १७ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात मोर्चा काढला होता. त्यानंतर याच प्रश्नावर शुक्रवारी उपोषण करण्यात आले. यात सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.या आंदोलनात सहभागी झालेले पंढरपूर शहर भाजपचे अध्यक्ष विक्रम शिरसाट यांनी पंढरपूर कॉरिडॉर रद्द न झाल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील.कारण पंढरपूर शहर व तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील असा इशारा शिरसाट यांनी दिला.
दरम्यान, या आंदोलनात हे कॉरिडॉर रद्द होणार नसेल तर आम्हाला पंढरपूर कर्नाटकला जोडण्याची मागणी करावी लागेल. त्यासाठी पुढील वर्षी आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या महापूजेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. मात्र या पंढरपूर कर्नाटकला जोडण्याच्या मागणीमुळे मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पंढरपूर कॉरिडॉर रद्द करण्यास सरकारला भाग पाडण्याची पंढरपूरकरांमध्ये हिंमत आहे. त्याप्रमाणे आम्ही ही लढाई जिंकू, असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त करीत कर्नाटकात जाण्याची मागणी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.