नवी मुंबई – काही महिन्यांपुर्वी दिल्लीच्या नोएडा येथील ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर आता नवी मुंबईतील कृष्णा आणि त्रिमुर्ती या इमारती जमीनदोस्त करण्याचे सर्वाच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,नेरूळ येथील सार्वजनिक उद्यानांच्या भूखंडावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या कृष्णा कॉम्फ्लेक्स आणि त्रिमुर्ती या दोन इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे नोएडा येथील अनधिकृत ट्वीन टॉवर जमीनदोस्त केल्यांनतर आता लवकरच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करत नवी मुंबईत हे ट्विन टॉवर जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. मात्र न्यायालयाच्या या आदेशाचा फटका आता येथे या दोन इमारतीत राहणाऱ्या १६०हून अधिक कुटुंबाला बसणार आहे.
विशेषतः नेरुळ येथील हे उद्यानासाठी राखीव असलेले भूखंड सिडकोने महापालिकेला हस्तांतरित केले होते. मात्र ज्यावेळेस या भूखंडांचा ताबा घेण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी सर्व्हेक्षण केले तेव्हा उद्यानाच्या दोन भूखंडांपैकी एका भूखंडावर कृष्णा कॉम्फ्लेक्स ही तळ मजला अधिक पाच मजले आणि दुसऱ्या भूखंडावरील त्रिमुर्ती पार्क ही तळमजला अधिक सहा मजली इमारत अनधिकृतरित्या उभी करण्यात आल्याचे आढळून आले आहे. टॉवर उभे राहिपर्यंत तसेच तेथे नागरिक राहायला येईपर्यत महापालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे आता न्यायालयाच्या निर्णयाचा फटका येथील १६० कुटूंबाना बसणार असून, या रहिवाश्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यांच्याबाबतीत सहानभूतीने विचार करण्याची मागणी या कुटूंबांकडून केली जात आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे बेघर होणारे कुटुंब आता राष्ट्रपतींकडे धाव घेणार आहेत. मात्र सहा दिवसात सर्वोच्च न्यायालयात स्वतः घर खाली करण्याबाबत लिहून द्यावे लागणार आहे. मात्र या प्रकरणात १६० कुटुंब ही रस्त्यावर आली तर याला जबाबदार कोण? जमीनमालक, बिल्डर आणि तत्कालीन पालिका अधिकऱ्यांवर कारवाई होणार का?, असा संतप्त प्रश्न आता या कुटुंबाकडूनही उपस्थित होत आहे.