नेरळ – तब्बल तीन वर्षानंतर आजपासून माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची सेवा सुरू झाली. आज सकाळी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून सुटली.
सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठीच तो आनंदाचा क्षण होता.ही ट्रेन सकाळी ११.३० वाजता माथेरानला पोहोचली.
माथेरान ते नेरळ या मिनी ट्रेनची सर्वांना प्रतिक्षा होती. अखेर तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर सेवा सुरू झाली आहे.ही सेवा सुरु झाल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माथेरान ते नेरळ ही मिनी ट्रेन सेवा नोव्हेंबरपर्यंत रुळावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर ऑक्टोबरमध्येच ही सेवा सुरू करण्यात आली आहे.२०१९ मध्ये माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातील रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून नेरळ-माथेरान मार्ग बंद होता. तर अमन लॉज ते बाजारपेठ मार्गावर शटल रेल्वे सुरु होती.गेल्या अनेक दिवसापासून रुळ बदलण्याचे काम सुरु होते. अखेर हे सर्व काम आता पूर्ण झाले आहे.
ऑगस्ट २०१९ पासून नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद होती. प्रचंड पावसामुळे घाटातील ट्रॅक पूर्णतः वाहून गेले होते. जमीन उरली नव्हती, त्यामुळं संपूर्ण मार्ग पुन्हा नव्याने बांधावा लागला. अखेर ही सेवा सुरु होत आहे. बंद असलेल्या मिनी ट्रेनमुळे पर्यंटकांचा हिरमोड होत होता.तर स्थानिकांनाही नेरळ ते माथेरान जाण्यासाठी अमन लॉजपर्यंत टॅक्सी आणि नंतर पायपीट करावी लागत होती. अखेर नोव्हेंबर २०२० पासून माथेरान ते अमन लॉज शटल सेवाच सुरु केली. मात्र नेरळ ते माथेरान अशी संपूर्ण मिनी ट्रेन सेवा बंदच ठेवण्यात आली होती. या मार्गावर रुळ, रुळालगतचे क्रॅश बॅरियरसह अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या. ही कामे पूर्ण होताच नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनची चाचणी केल्यानंतर आजपासून सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.