काठमांडू- नेपाळ कॉंग्रेसचे रामचंद्र पौडेल यांची नेपाळचे नवे आणि तिसरे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पौडेल यांना ३३,८०२ मते मिळाली, तर त्यांचे विरोधक सुभाष चंद्र नेमबांग यांना १५,५१८ मते मिळाली. नेपाळच्या निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली. विद्यमान राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांचा कार्यकाळ १२ मार्च रोजी संपत आहे. काल संसद भवनात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले होते. यानंतर निकाल जाहीर झाला. पराभूत नेमबांग यांना त्यांचा सीपीएन-यूएमएल पक्ष वगळता फक्त दोन अपक्षांचा पाठिंबा होता. दुसरीकडे, रामचंद्र पौडेल यांना नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन यासह आठ पक्षांच्या युतीकडून २१४ खासदार आणि ३५२ प्रांतीय विधानसभा सदस्यांची मते मिळाली.
नेपाळी काँग्रेसचे प्रमुख शेर बहादूर देउबा यांनी ट्विट करत पौडेल यांचे अभिनंदन केले. निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शालिग्राम यांनी सांगितले की,राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ५१८ प्रांतीय असेंब्ली आणि फेडरल संसदेच्या ३१३ सदस्यांनी मतदान केले. २००८ मध्ये प्रजासत्ताक बनल्यानंतर नेपाळमधील ही तिसरी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे.