तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू
नाशिक: – नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ एसटी बसने तीन दुचाकीस्वारांना चिरडल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातानंतर एसटी बसने पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला.
एसटी महामंडळाची बस नाशिककडून पुण्याच्या दिशेने जात असताना पळसे गावानजीक असलेल्या चौफुलीवर गतिरोधकाजवळ एका क्रेटा कारने अचानक ब्रेक लावून कार थांबवली. कार अचानक थांबल्याने मागून येणाऱ्या एसटी चालकाला बस नियंत्रित करता आली नाही आणि बस क्रेटा कारला धडकली. याचवेळी गतिरोधकावर संथ गतीने जाणारे तीन दुचाकींनाही धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये तीन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बसने देखील पेट घेतला आणि ही बस भस्मसात झाली. या घटनेत 10 ते 12 जण जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले.