नाशिक – नाशिकमध्ये तब्बल १०८ मंडळांना शिवजयंतीची परवानगी नाकारण्यात आली. शासनाच्या मंडप धोरणाच्या नियमांची पुर्तता न केल्याने हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेकडे एकूण ३२६ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील १९५ मंडळांना परवानगी देण्यात आली तर, येत्या दोन दिवसात उर्वरित २० अर्जांवर निर्णय घेतला जाणार आहे.
यावर्षी नाशिक रोडपेक्षा सिडको विभागात शिवजयंतीचा जल्लोष आहे. यानिमित्त शहरात सर्वत्र भगवे झेंडे फडकत आहेत. दरम्यान, यासाठी महापालिकेची परवानगी घेणे अनिवार्य होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणीसाठी शासनाच्या मंडप धोरणानुसार परवानगीची सक्ती करण्यात आली. यात मंडळांना परवानगीसाठी खिडकी योजना राबविण्यात आली. महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर बांधकाम, अग्निशमन विभाग, शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करून ना हरकत दाखले देण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यानुसार एकूण ३२६ पैकी १९५ मंडळांना परवानगी मिळाली. मात्र, मंडप धोरणाची अंमलबजावणी न झाल्याने १०८ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले. नाकारण्यात आलेल्या अर्जांमध्ये बहुतांश अर्ज दुबार नावांचे होते.