संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

नाशिकमध्ये सत्यजित तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती! चूक झाल्याचे अजित पवारांचे वक्तव्य

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बारामती : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. तांबे कुटुंब तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आल्याचे ते म्हणाले होते. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी आमची चूक झाली, सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती, असे विधान केले आहे. ते बारामतीमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.

सत्यजित तांबेंनी कालच पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवरच गंभीर आरोप केले. मला अखेरच्या क्षणी चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला. आमच्या विरोधात कट रचण्यात आले.असे अनेक स्फोट केल्यांनतर आता बारामती येथील जाहीर सभेत अजित पवारांनी सत्यजित तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, असे वक्तव्य करत सत्यजित तांबेंची बाजू घेतली आहे.

सध्याच्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल हा राज्यकर्त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा असल्याचे बारामती येथे जाहीर सभेत अजित पवार म्हणाले. सध्या जो शिकलेला मतदार आहे, त्याने कशा प्रकारचा कौल दिला आहे, हे आपण पाहिले. त्यामुळे आमची जरा चूक झाली. नाशिक पदवीधर मतदारसंघातून सत्यजीत तांबे यांना उमेदवारी द्यायला हवी होती. तरुण चांगेल काम करत असतील तर त्यांना संधी द्यायला हवी, या मताचा मी आहे. मात्र कोणाला उमेदवारी द्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकरणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याचे चित्र समोर आले आहे. कारण अजित पवारांनीच तांबे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आणला, असे नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर आज सभेत अजित पवारांनी सत्यजित तांबेंना उमेदवारी द्यायला हवी होती, असे म्हटले आहे. त्यामुळे आता पवारांनी पटोलेंवर हा निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या