नाशिक- मुंबईनंतर आता नाशिकमध्येही गोवराचे ४ संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवले आहेत. या प्रकारामुळे राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. गोवराची तपासणी करण्यासाठी आणि लसीकरणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा, असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.
मुंबईसह राज्यात गोवराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत गोवरामुळे १० बालकांचा मृत्यू झाला आहे. असे असताना नाशिकमध्येही गोवराचे ४ संशयित रुग्ण सापडले आहेत. या मुलांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. राज्यात गोवराची दहशत निर्माण झाली असली तरी परिस्थिती आटोक्यात आहे. सरकार उपाय योजना करत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. गोवंडी, भिवंडी आणि मालेगाव गोवराचे हॉटस्पॉट आहेत. गोवंडीत सव्वा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे मुंबईतील गोवराच्या संशयित मृतांची संख्या १० झाली. भिवंडीतील एका रुग्णाचाही मुंबईत मृत्यू झाला. सोमवारी मुंबईत गोवराचे २४ नवे रुग्ण सापडले. मुंबईच्या गोवंडीत सर्वाधिक म्हणजे ६ गोवराचे रुग्ण सापडले आहेत. कुर्ल्यात ५, अंधेरी पूर्वमध्ये ३, प्रभादेवी, गोरेगाव आणि कांदिवलीत प्रत्येकी २, भायखळा, माटुंगा, भांडुप, चेंबूर येथे प्रत्येकी १ रुग्ण गोवराचा आढळला आहे. त्यामुळे गोवराच्या रुग्णांची संख्या २०८ झाली आहे. मालेगावपाठोपाठ नाशिकमध्येही गोवराचे ४ संशयित रुग्ण सापडले. या बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले आहेत. यामुळे नाशिकमध्ये गोवराचा धोका वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर आरोग्य विभाग सर्वेक्षण करणार आहे. गोवराचा फैलाव रोखण्यासाठी जादा लसीकरण मोहीम आणि शिबिरे राबवली जात आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.