नाशिक – मागील काही महिन्यांपासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या नंदिनी नदीला मोकळा श्वास घेता यावा म्हणून आता अनोखा प्रयोग राबविण्यात येणार आहे. नंदिनी नदीमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी आता या नदीच्या काठावर तब्बल २६ सीसीटीव्ही लावले जाणार आहेत.तसा निर्णय पालिका प्रशासन आणि स्मार्ट सिटीने घेतला आहे .
नाशिक शहरातून वाहणारी पूर्वीची नासर्डी नदी अलीकडे पर्यावरण प्रेमींच्या जनजागृतीमुळे नंदिनी झाली.मात्र आजूबाजूला असलेल्या वस्तीमुळे नेहमीच नदी प्रदूषित होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण प्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी लढा देत आहेत.मात्र आता नंदिनी नदीचे प्रदूषण रोखले जावे, यासाठी या नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत १० ठिकाणी एकूण २६ कॅमेरे बसविण्याचे स्मार्ट सिटीने निश्चित केले आहे. याबाबतचे पत्र शिवसेनेचा ठाकरे गट व सत्कार्य फाउंडेशनचे बाबासाहेब गायकवाड यांना मिळाला आहे. गायकवाड दाम्पत्याने गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. नंदिनी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा टाकून प्रदूषण केले जाते. वाळू उपसाही मोठ्या प्रमाणात केला जातो. मद्यपी,गर्दुल्ले हे नदीपात्रात येऊन बसतात.याठिकाणी लपण्यासाठी गुन्हेगारही आश्रय घेतात. नंदिनीमुळे गोदावरीचेही प्रदूषण वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात येते. प्रदूषण रोखण्यास मदत व्हावी, नदी व परिसरातील नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी नदीच्या दोन्ही किनारी उंटवाडी ते गोविंदनगरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे,अशी मागणी मनपा आयुक्त आणि स्मार्ट सिटीकडे करण्यात आली होती.
दरम्यान, स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या २३ व्या बैठकीत या संदर्भातील विषयाला मंजुरी देण्यात आली. याबाबतचे इतिवृत्तही मंजूर करण्यात आले. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वर्कऑर्डर देण्यात आली आहे. याबाबतचा स्थळ पाहणी तांत्रिक अहवाल स्मार्ट सिटीला कॉन्ट्रॅक्टरने दिला आहे.