नाशिक – नाशकातील रामकुंडाजवळील प्राचीन श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात मंदिरास गळती लागत होती. तसेच अनेक ठिकाणी मंदिराचे बांधकाम जीर्ण झाल्याने मंदिराची होणारी झीज थांबविण्यासाठी मंदिर प्रशासनाने रीतसर टेंडर काढून मंदिर जीर्णोद्धार कामास सुरुवात केली आहे.
घुमट व सभामंडपातून पावसाळ्यात पाणी झिरपत असल्याने तसेच दगड जीर्ण झाल्याने त्याला तडे पडल्याचे पुजारी तसेच भाविक भक्तांच्या निदर्शनास आले होते.त्यानंतर प्रशासनाने मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यात मंदिराचे दगडी चिरे काही ठिकाणी ठिसूळ झाल्याचे व काही ठिकाणी बांधकाम कमकुवत होऊन गळती लागली असल्याचे समोर आले. तसेच या पुरातन मंदिराचे पावित्र्य तसेच ऐतिहासिक वास्तू जतन करण्याच्या दृष्टीने जीर्णोद्धार करणे गरजेचे असल्याने काम हाती घेण्याचा निर्णय विश्वस्त तसेच भाविकांच्या बैठकीत घेण्यात आला होता. पावसाळा संपल्याने विधिवत पूजन करण्यात आले व मंगळवारी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला.जीर्णोद्धाराचे काम अंदाजे पाच ते सहा महिने सुरू राहणार असून या कामासाठी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे विश्वस्तांनी सांगितले