नागपूर – शहरातील सीताबर्डी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या आदिवासी शहीद गोवारी उड्डाणपुलावर काल शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघाताची घटना घडली.एका भरधाव क्रेटा कारने टाटा एस या मिनी ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात ९ जण जखमी झाले.जखमींमध्ये चार महिला आणि काही तरुणांचा समावेश आहे.
रात्री उशिरा झालेल्या अपघातातील कार चक्काचूर झाली.तर मिनी ट्रक समोर जावून उलटला. या मालवाहू मिनी ट्रकमधून प्रवास करणारे लोक वेटर्सचे काम करणारे असल्याचे सांगितले जात आहे.जखमींपैकी ४ महिला आणि २ तरुण गंभीर जखमी झाले आहे.यातील काही महिला बेशुद्ध पडल्या होत्या.मिनी ट्रकचा ड्रायव्हर वाहनातच अडकून पडला होता.त्याला काचा फोडून बाहेर काढले.अपघातानंतर घटनास्थळी रात्रीही बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान,काही दिवसांपूर्वीच म्हणजे मंगळवारी याच परिसरातील उड्डाणपुलावर अनियंत्रित ट्रॅव्हल्सने अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला चिरडले होते. या अपघातात तिची मैत्रीणही गंभीर जखमी झाली होती.काही महिन्यांपूर्वी सक्करदरा येथील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जीव गेला होता.तसेच सीताबर्डी येथील उड्डाणपुलावरही अशीच घटना घडली होती.