औरंगाबाद – पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ डिसेंबरला लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर एक थरारक घटना घडली आहे.शिर्डी- नागपूर या समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना काल सायंकाळी घडली. या आगीत कार जळून खाक झाली.तर कारमधील चारजण सुदैवाने बचावले आहेत.
औरंगाबादनजीक वैजापूरजवळील गलांडे वस्तीजवळील ही दुर्देवी घटना घडली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. पुण्यातील भोसरी येथील नितीन राजपूत हे आपल्या कुटुंबासह सिंदखेडराजा येथून शिर्डीमार्गे पुण्याकडे परतत होते.त्यावेळी धावत्या कारमध्ये काहीतरी जळाल्याचा वास येत असल्याने त्यांनी कार हायवेच्या एका बाजूला उभी केली.इतक्यात कारने अचानक पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की या आगीत कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते, मात्र या आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.या दुर्घटनेतून नितीन राजपूत यांच्यासह दिपा राजपूत,सुरेश राजपूत आणि राजेश राजपूत हे चौघे बचावले आहेत.