नवी मुंबई- बेलापूर ते मांडवा पर्यत वॉटर टॅक्सी सेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. आजपासून सुरु झालेल्या या वॉटर टॅक्सीचा लाभ २१ प्रवाशांनी घेतला असून सध्या ही सेवा केवळ शनिवार-रविवार सुरु असणार आहे. नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ सव्वा तासात पार करता येणार आहे.
नयनतारा शिपिंग कंपनीने मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने ही सेवा सुरु केली असून आज पहिली फेरी रवाना झाली आहे. याचा लाभ २१ प्रवाश्यांनी घेतला. यासाठी प्रती प्रवासी ३०० रुपये भाडे आकारण्यात आले असून बोटीची प्रवासी क्षमता ही २०० आहे अशी माहिती नयनतारा शिपिंगचे कॅप्टन रोहित सेन्हा यांनी दिली. काही आठवड्यातच याला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. बेलापूर येथून सकाळी ८ वाजता सदर वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडवा येथे पोहोचेल तर संध्याकाळी ६ वाजता मांडवा येथून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूर जेट्टी येथे पोहोचेल. या सेवेसाठीच्या ऑनलाईन बुकींगला २३ नोव्हेंबर रोजी सकाळ पासून सुरुवात झाली आहे.