संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

नवाब मलिकांची पॉवर ऑफ एटर्नी बोगस असल्याचा ईडीचा कोर्टात दावा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*पुढील सुनावणी १९ सप्टेंबरला

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला काल बुधवारी ईडीने जोरदार विरोध केला. यावेळी नवाब मलिक यांची पॉवर ऑफ एटर्नी ही बनावट असून त्यांचा संबंध ‘डी कंपनी “सोबत होता असा दावा करणारा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी पीएमएलए न्यायालयात केला.
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी पीएमएलए कोर्टाला सांगितले की, नवाब मलिक यांनी न्यायालयासमोर ज्या पॉवर ऑफ एटर्नीचा उल्लेख केला आहे, त्यावर मुनिरा प्लम्बरने कधी सही केलीच नव्हती. त्यामुळे ती पॉवर ऑफ एटर्नी ही बोगस आहे. नवाब मलिक यांचे कनेक्शन ‘डी-कंपनी’सोबत होते. मुंबईत ‘डी-कंपनी’चे सारे कारभार दाऊदची बहीण हसीना पारकर पाहत होती. त्यामुळे तिच्याच देखरेखी खाली कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडचा हा व्यवहार झाला होता. त्यामुळे हे प्रकरण दहशतवादी संघटनेला एक प्रकारे थेट टेरर फंडिंग करणारे असल्याचा युक्तिवाद अॅड. सिंह यांनी करत नवाब मलिक यांना जामीन देण्यात येऊ नये अशी मागणी केली. ईडीच्यावतीने युक्तिवाद संपला असून आता पुढील सुनावणी १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सुनावणीत मलिक यांचे वकील अमित देसाई जामिनासाठी युक्तिवाद करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. दहशतवादी कारवायांना होणाऱ्या आर्थिक मदतीच्या अनुषंगांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा तपास सुरू आहे. यामध्ये नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने व्यवहार केला असल्याचा आरोप आहे.
दरम्यान, नवाब मलिकांनी शहावली खानच्या साथीने गोवावाला कंपाऊंडमधील बेकायदेशीर भाडेकरूंचा सर्व्हे करून घेतला. त्यामुळे तिथल्या अनियमिततेची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यासाठी मलिकांनी सरदार खानसह हसीना पारकरसोबत मलिकांनी अनेकदा बैठकाही केल्या. सरदार खानचा भाऊ मुनिरा प्लंबरसाठी तिथे भाडे वसुलीचे काम करायचा. सरदार खानने ईडीला दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे ‘कुर्ला जनरल स्टोअर्स’ या नावाने गाळा अडवून ठेवला होता. त्याची मालकी अस्लम मलिकच्या नावे होती.
१९९२ नंतर ते दुकान बंद करण्यात आले.१९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावला खान हा औरंगाबाद जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना जेव्हा जेव्हा पैरोलवर बाहेर यायचा तेव्हा तेव्हा नवाब मलिक, अस्लम मलिक,हसीना पारकर, सरदार खान यांच्यात बैठका व्हायच्या.गोवावाला कंपाऊंडचा जास्तीत जास्त भाग गिळंकृत करण्यासाठीचा सर्व्हेयरच्या मदतीने मलिकांनी तिथे बेकायदेशीर भाडेकरू घुसवले.तपासयंत्रणेला साल २००५ मधील मिळालेल्या कागदपत्रांवरून हे सिद्ध होत असल्याचा दावा मलिकांविरोधातील आरोपपत्रात करण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami