संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

नवरात्रीच्या नवदुर्गा : स्त्रीने कोणत्याही दबावाखाली न येता फुलले पाहिजे – अमृता फडणवीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
  • अश्विनी मेढी-घाटपांडे

गाणं ही आवड मानणार्‍या अमृता फडणवीस या व्यवसायाने एक बँकर आहेत. पण त्या आपल्या गायकीचा उपयोग फक्‍त स्वत:च्या आनंदासाठी करत नाहीत तर अनेक सामाजिक संदेश देण्यासाठी करतात. त्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्यही करतात. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. याशिवाय त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आहेत. काय आहेत त्यांच्या स्वभावाचे आणखी पैलू? जाणून घेऊया त्यांच्याचकडून…

प्रश्न : अमृताताई, तुमचे बालपण कुठे गेले, शिक्षण कुठे झाले?

उत्तर : माझा जन्म नागपूरमध्ये झाला. माझे बालपणही नागपूरमध्येच गेले. माझे आई-बाबा दोघेही डॉक्टर आहेत. माझी आजी पुण्यात असायची आणि काही नातेवाईक मुंबईला असल्याने पुणे, मुंबईला खूप फिरणे व्हायचे. माझे शालेय शिक्षणही नागपूर येथे झाले आहे. मी वाणिज्य शाखेची पदवीधर असून एमबीए फायनल केले आहे. शिवाय कर कायद्याचेही (Taxation law) शिक्षण घेतले आहे.

प्रश्न : आई-वडील दोघे डॉक्टर असूनही तुम्हाला डॉक्टर व्हावेसे वाटले नाही का? तुम्ही बँकिंग हे क्षेत्र का निवडले?

उत्तर : त्या प्रकारची मेहनत करण्याची माझी तयारी नव्हती. माझे बारावीपर्यंत सायन्स होते. गांडूळाचे, बेडकाचे विच्छेदन करताना मला खूप त्रास व्हायचा. मला त्यात मजा यायची नाही, पण घरचा, आईच्या क्‍लिनिकचा हिशोब पाहणे हे करायला मला खूप आवडायचे आणि सहज जमायचेही. डॉक्टर होणे सोपे नाही. वैद्यकीय व्यवसाय हा पूर्ण वेळचा व्यवसाय आहे, यात तुम्हाला पूर्णपणे स्वत:ला झोकून द्यायला लागते. मी माझ्या डॉक्टर आईला लहानपणापासून पाहत आले, तिला स्वत:साठी अजिबात वेळ नसायचा. मला हे नको होते. मला बँकिंग बरोबरच गाण्याचीही खूप आवड होती. मला या दोन्ही गोष्टींना योग्य न्याय द्यायचा होता म्हणून मी डॉक्टर होणे जाणूनबुजून टाळले.

प्रश्न : तुमचे आणि देवेंद्रजींचे लग्‍न कसे ठरले?

उत्तर : देवेंद्रजींच्या आई, म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझी आई यांची एक कॉमन मैत्रीण होती. त्या मैत्रिणीशी त्या दोघी वेगवेगळ्या वेळेस असे बोलल्या की आम्ही आता स्थळे बघत आहोत. तेव्हा त्या मैत्रिणीने आम्हाला एकमेकांचे स्थळ सुचवले. मग आम्ही एकमेकांना भेटायचे ठरवले. देवेंद्रजींची आणि माझी पहिली भेट त्यांच्या एका मित्राच्या घरी झाली. मग एकमेकांना समजून घेण्यासाठी आम्ही कधी माझ्या नणंदेच्या घरी, कधी माझ्या घरी, कधी मुंबईला, कधी ड्राईव्हला जाऊन, असे आम्ही तीन-चार वेळा भेटलो आणि परस्परांचे विचार पटल्यावर लग्‍न करायचे ठरवले. सुरुवातीला होकार द्यायला मी थोडा वेळ घेतला कारण माझे आजी-आजोबा, आई-बाबा सर्व डॉक्टर आणि देवेंद्रजींचे पूर्ण राजकीय पार्श्वभूमी असलेले कुटुंब त्यामुळे जीवनशैलीत खूप फरक होता. त्यामुळे या परिवारात आपण सामावू शकू का? अशी शंका मला वाटायची. पण आम्ही भेटल्यानंतर देवेंद्रजींनी मला खूप कम्फटेबल केले. ‘तुझं करियर करण्यासाठी तुला स्वातंत्र्य असेल. तू जे करशील त्यात मी तुझ्या पाठीशी नेहमी असेन’, असा विश्वास दिला. त्यांच्या या दुसर्‍याचा विचार करण्याच्या स्वभावाने मी खूप प्रभावित झाले आणि त्यांच्याशीच लग्‍न करायचं ठरवलं.

प्रश्न : तुमच्या एका भेटीत देवेंद्रजी तुम्हाला ‘तू काजोल सारखी दिसतेस’ असे म्हणाले होते ते खरे आहे का?

उत्तर : हो, हे खरे आहे.

प्रश्न : तुम्ही बँकिंग क्षेत्रात आहात, मग गाण्याची आवड तुम्हाला कशी लागली?

उत्तर : माझी ही आवड आताची नाहीये. मी लहानपणापासूनच गाणे शिकत होते. माझे वडील डॉक्टर तर आहेतच पण चांगले शास्त्रीय गायकही आहेत. ते गजलही छान म्हणतात. माझी आजीही छान शास्त्रीय संगीत शिकली होती. तिच्याकडून मला संगीताचे बाळकडू मिळाले. नंतर मी गुरूंकडे गाणे शिकायला सुरुवात केली. नागपुरात श्री. अरबेटवार, श्री. राजहंस, श्री. लोखंडे गुरुजी या गुरूंनी मला गाण्याचे अतिशय उत्तम शिक्षण दिले. मी सुगम संगीताच्या अंगानेच शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे.

प्रश्न : तुमचा आवाज खूप खडा आहे आणि थोडासा अपरंपरागत वाटतो. त्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न करता का? तुम्ही चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे का?

उत्तर : माझा आवाज नैसर्गिक रित्या थोडा खडाच आहे. कुठल्या स्वरूपाचं गाणं आहे त्यानुसार मी त्या गाण्याची स्टाईल ठरवते. मी जवळपास दहा-बारा हिंदी चित्रपटांसाठी आणि सात ते आठ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. याशिवाय अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्येही गायले आहे.

प्रश्न : तुमचे आवडते गायक कोण?

उत्तर : मला लता दीदी, आशाताई भोसले या सदाबहार गायिका खूप आवडतात.

प्रश्न : तुमचे गाण्याचे बरेचसे म्युझिक व्हिडिओ हे काहीतरी सामाजिक संदेश देणारे असतात. या मागची तुमची भूमिका?

उत्तर : गाणं हे माझी ‘पॅशन’ आहे. मला गायला खूप आवडतं. यातून माझी कुठल्याही आर्थिक फायद्याची अपेक्षा नाही. या माझ्या गायन कलेचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने मी चांगले सामाजिक संदेश देणारे व्हिडिओही करते. यातून माझी आवडही जोपासली जाते आणि मला समाधानही मिळते.

प्रश्न : तुम्ही नेहमी सोशल मीडियाचा वापर करत असता. या माध्यमावर कौतुकही होत असते आणि टीकाही होते, या सगळ्याकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर : स्त्रीशक्‍ती ही खूप मोठी शक्‍ती आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्‍ती असते. ती बर्‍याचदा बाहेर येत नाही. आपल्या आजूबाजूला आपण अशा अनेक महिला पाहतो की त्यांच्याकडून सतत आपल्याला काहीतरी शिकावेसे वाटते आणि अशा महिलांच्या सहवासात आपण राहिलो की ती शक्‍ती लवकर बाहेर येते. आपणही असा आदर्श घालून दिला पाहिजे, असे मला वाटते. माझ्याही आसपास बर्‍याच अशा महिला आहेत, ज्यांच्याकडून मी सतत काही शिकत असते. जसे की, माझी आई. ती प्रत्येक गोष्ट संयमाने आणि तितक्याच प्रेमाने करते. तिला जे योग्य वाटते तेच ती कुटुंबासाठी करते. तसेच मी वागण्याचा प्रयत्न करते. मला जे पटेल, योग्य वाटेल तेच मी करते. माझ्यातल्या शक्‍तीला वाट मोकळी करून देते. टीकाकारांकडे लक्ष देत नाही पण कौतुक करणार्‍यांकडून प्रेरणा नक्‍की मिळते.

प्रश्न : तुम्ही सामाजिक कार्यातही बर्‍याच सक्रिय आहात. त्याविषयी थोडे सांगा.

उत्तर : आम्ही आमच्या दिव्यज फाऊंडेशनतर्फे वेगवेगळी सामाजिक कामे करतो शिवाय मी वैयक्‍तिक पातळीवरही अनेक सामाजिक कामे करत असते. झोपडपट्टीतल्या मुलांना गाण्याचे शिक्षण देऊन त्यातील गुणी मुलांचे टॅलेंट हंटसारखे कार्यक्रम घेणे, अ‍ॅसिड हल्‍ला पीडितांसाठी आम्ही त्यांच्यातील आत्मविश्वास जागा व्हावा म्हणून फॅशन शोसारखे कार्यक्रम राबवणे, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांसाठी समुपदेशन, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसाठी स्वास्थ्य, जनजागृती अभियान, कोविडच्या काळात आम्ही रक्‍तदान, प्‍लाझ्मा दान, गरजेच्या वस्तूंचे वाटप असे उपक्रम राबवले आहेत. याशिवाय आम्ही तीन गावे दत्तक घेतली होती त्यातील नेट्री हे नागपूरजवळचे एक गाव आता आदर्श गाव आहे.

प्रश्न : या सगळ्या व्यापात घर आणि करियरची सांगड कशी घालता?

उत्तर : हे सगळं तुमच्या प्राधान्य क्रमानुसार ठरते. तुम्ही वेळेचे व्यवस्थापन कसे करता यावर ठरते. या सगळ्यात तुम्हाला मदतीची गरज लागतेच. माझी आई, माझ्या सासूबाई, आमचे सर्व मदतनीस, सहाय्यक वर्ग यांच्याशिवाय हे शक्य होत नाही. त्याशिवाय तुम्ही जे करताय त्यात तुमचे 100 टक्‍के देणे यातून हे साध्य होते. याबाबतीत मला मुंबईच्या नोकरदार महिला वर्गाचे विशेष कौतुक वाटते. त्यांना फारशी कुणाची मदत नसते तरीही त्या घर, नोकरी, रोजचा प्रवास अशी किती तारेवरची कसरत करत असतात. त्या घर, करियर आणि वेळ व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण आहेत, असं मला वाटते. त्यामानाने मला तितके हे अवघड जात नाही कारण मला सर्वांची मदत असते.

प्रश्न : मोकळा वेळ मिळेल तेव्हा काय करता?

उत्तर : मी माझा मोकळा वेळ माझी मुलगी दिविजाबरोबर घालवते. तसेच गाणी ऐकते.

प्रश्न : एक आई, स्त्री म्हणून तुम्हाला तुमच्या मुलीकडून काय अपेक्षा आहेत?

उत्तर : मला असे वाटते की, तिने कुठल्याही दबावाखाली न येता फुलले पाहिजे. तिच्यामध्ये जे चांगले आहे ते अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तिच्यात आत्मविश्वास असायला हवा. पैसा हे सर्वस्व न मानता तिने लोकांसाठी चांगले कार्य करायला हवे. समाजाप्रती सहानुभूती जपावी.

प्रश्न : नवरात्र उत्सवाबद्दल काय सांगाल?

उत्तर : या काळात देवीची नऊ रूपे आपल्याला बघायला मिळतात. यातील प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी शिकवत असते. एक रूप प्रेम दाखवत असते तर दुसरे लढवय्या वृत्ती कशी असावी ते सांगतं. ही नऊही रूपे आपल्यात असतात. एका रूपातून जे काही मानवरूपी दानव आहेत त्यांना शिक्षा देणे आणि एका रूपातून समाजात प्रेमही पसरवणे ही आपली जबाबदारी आहे.

प्रश्न : या उत्सवाच्या निमित्ताने तरुणींना, महिलांना काय सल्‍ला द्याल?

उत्तर : आज आपण जे आसपास पाहतोय, स्त्रियांसाठी स्वत:चे करियर घडवण्यासाठी, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी खूप पर्याय खुले झाले आहेत. पण दुसरीकडे परिस्थिती वेगळी आहे. तिला जगायचा हक्‍क मिळत नाही. स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. बलात्कार होत आहेत. तर सर्व स्त्री शक्‍तीने एकत्र येऊन अडचणीत आलेली एखादी महिला, पीडित महिला मग ती ओळखीची असो वा अनोळखी, तिच्यासाठी उभे राहायला हवे. म्हणजे आपल्यासमोर अशा घटना घडण्याआधी दहा वेळा विचार केला जाईल.

आवडता रंग : लाल

आवडता पोशाख : साडी

तुमचा आवडता पदार्थ आणि तुमच्या हातचा घरच्यांना आवडणारा पदार्थ : मला खूप तूप घातलेली पुरणपोळी आणि उकडीचा मोदक खूप आवडतो. एकदा मी केलेला चिंचेचा भात देवेंद्रजींना खूप आवडला होता आणि त्यांना पुन्हा खावासा वाटला म्हणून 2-3 वेळा केला आणि दिविजाला घरी केलेली पाणीपुरी खूप आवडते.

आवडते सहलीचे ठिकाण : महाबळेश्वर, माथेरान

आवडता खेळ : टेनिस. शाळेत असताना 16 वर्षांखालील मुलींच्या गटात मी राज्य स्तरावरील विजेता होते.

स्वत:मधला आवडता गुण : बेधडकपणा

आयुष्यातील आदर्श स्त्री : माझी आई

आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण : माझी मुलगी दिविजाचा जन्म

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करता : योगसाधना करते.

संबंधित बातम्या
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami