मुंबई – बोगस जातपडताळणी प्रमाणपत्रप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी शिवडी कोर्टाकडे वेळ मागितला. यावरून नाराजी व्यक्त करत शिवडी कोर्टाने पोलिसांना खडसावले.‘कोर्टाच्या आदेशांचे पालन होताना इथे दिसत नाही, असे म्हणत कारवाई का होत नाही? आरोपी महाराष्ट्रातच आहेना? असे प्रश्न कोर्टाने पोलिसांना विचारले. याप्रकरणावर पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप नवनीत राणांवर आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नवनीत राणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टाने या वॉरंटवर मुलुंड पोलिसांना कारवाईचे आदेश जारी केले. नवनीत राणांनी मुंबई सत्र न्यायालयात या वॉरंट विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका अद्याप प्रलंबित असून मुंबई सत्र न्यायालयाने अद्याप कारवाईला स्थगिती न दिल्याने शिवडी कोर्टाने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले आहेत. परंतु अद्यापही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता आणखी वेळ मागितल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.