मुंबई : – नरिमन पॉईंटजवळ आज रविवारी सकाळी सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने एकामागे एक करत तीन वाहनांना ठोकले. गाडीचा वेग इतका भयानक होता की वाहनांना ठोकून गाडी पूर्ण उलट्या दिशेला फेकली गेली. एअर इंडिया इमारत समोर ही घटना घडली. या घटनेनंतर लोकांनी गर्दी केली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. चौकशीदरम्यान गाडीतील तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
रविवारची सकाळ असल्याने मरिन ड्राईव्हवर रहदारीचे वातावरण होते. अशातच ही धक्कादायक घटना नरिमन पॉईंटजवळ घडली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे चालक रॅश ड्रायव्हिंग करत होता. सुसाट गाडीने एकामागे एक करत तीन वाहनांना ठोकले. यामध्ये काहींना किरकोळ दुखापत झाली तर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यांनतर गाडीतील तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तिन्ही तरुणांना पोलिसांनी मरिन लाईन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले.