संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

नयनताराला देवदर्शन महागात; चप्पल न काढल्याने कायदेशीर नोटीस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चेन्नई – दाक्षिणात्य सुपरस्टार नयनताराच्या विरोधात कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. नयनतारा आणि विघ्नेश शिवन लग्नानंतर तिरुपती मंदिरात पोहोचले होते. त्यावेळी नयनतारा चप्पल घालून फिरताना दिसल्याने आता ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. ‘नयनताराने मंदिर परिसरात फोटो काढले शिवाय तिने पायातील चप्पलादेखील काढल्या नव्हत्या’, असा आरोप मंदिर समितीने केला आहे. दरम्यान, तिरुपती मंदिरात किंवा त्याच्या आवारात अनवाणी चालणे ही धार्मिक प्रथा आहे. त्यामुळे तिथे नयनताराला चप्पल घातलेलं पाहून तेथील लोकांनी संताप व्यक्त केला.

नयनतारा आणि विघ्नेश शिवन गेले ६ वर्ष डेटिंग करत होते. यंदा ९ जूनला दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. लग्नात कुटुंबातील मंडळी, मित्रमंडळी आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज सहभागी झाले होते. शाहरुख खानसह रजनीकांतने या सोहळ्याची शोभा वाढवली. लग्नात लाल रंगाच्या साडीत नयनतारा अतिशय सुंदर दिसत होती. लग्नानंतर शुक्रवारी, १० जून रोजी हे जोडपं तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलं होतं. त्यावेळी दोघांना हातात हात घालून देवदर्शन करताना पाहून चाहते खूश झाले. मात्र एकीकडे अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना दुसरीकडे तिरुमाला तिरुपती देवस्थानम समितीने तिला नोटीस पाठवली. तिरुमला तिरुपती देवस्‍थानम समितिचे चीफ विजलेन्स सिक्योरिटी अधिकारी नरसिंह किशोर यांनी नयनतारावर आरोप केला की, ती त्याठिकाणी चप्पल घालूनच फिरत होती. मंदिरात छायाचित्रे घेण्यास मनाई आहे, परंतु त्यांनी हा नियमदेखील मोडल्याचा आरोप मंदिर समितीने केला आहे.

नरसिंह किशोर यांनी म्हटले की, ‘नयनतारा मंदिर परिसरात चप्पल घालून फिरत होती. आमच्या सुरक्षा रक्षकांनी तिला लगेच अडवले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की, दोघांनी नियम मोडून फोटोशूटदेखील केले आहे. याबाबत मंदिर समितीने अभिनेत्रीशी बातचीत केली असून त्यांनी तिला व्हिडिओ मेसेजद्वारे माफी मागण्यास सांगितले आहे. तसेच आम्ही नयनताराला नोटीस पाठवत आहोत. आम्ही तिच्याशी फोनवरूनदेखील संपर्क करत आहोत. ती व्हिडिओ मेसेज जारी करून भगवान बालाजी, मंदिर समिती आणि भाविकांची माफी मागायला तयार आहे.’ दरम्यान, नयनातारा हिने मुख्य मंदिरात पोहोचल्यावर चप्पला काढल्याचेही समोर आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami