नवी दिल्ली – भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी बुधवारी ४० वर्षांचा झाला. यानिमित्ताने त्याला अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीपासून ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयपर्यंत आणि सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत सर्वांनीच शुभेच्छा दिल्या. मात्र अशातच भारताचा माजी सलामीवीर आणि सध्या भाजपा खासदार असणाऱ्या गौतम गंभीरने केलेल्या एका कृतीमुळे तो प्रचंड ट्रोल झाला आहे. गंभीरने धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्या फेसबुक पेजवरील कव्हर फोटो बदलला. त्याने २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील फोटो कव्हर फोटो म्हणून ठेवला. या फोटोमध्ये डाइव्ह मारुन मळलेल्या जर्सीमध्ये गंभीर बॅट वर करून अभिवादन करताना दिसत आहे. धोनीच्या वाढदिवसाच्या दिवशीच गंभीरने हा फोटो शेअर केल्याने २०११चा विश्वचषक जिंकून देण्यात धोनीबरोबर मीसुद्धा तितकाच महत्त्वाचा वाटा उचलला होता, असे सांगण्याचा प्रयत्न गंभीरने यामधून केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच त्याला अनेकांनी ट्रोल केले आहे.
गंभीरने फेसबुकवर कव्हर फोटो बदलल्यानंतर त्याच्यावर धोनीचे चाहते अक्षरश: तुटून पडले आहेत. एका चाहत्याने गंभीरने असे करणे हे लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. तर धोनीच्या अन्य एका चहत्याने म्हटलंय, ‘धोनीचे वैशिष्ट्य हे आहे की तो शांत आहे आणि निवृत्तीनंतर तो अशा लोकांकडे लक्ष देत नाही जे एखाद्या अजेंड्याअंतर्गत त्याच्याविरोधात काम करतात.’ त्याचबरोबर ‘तू हे असे वागतो म्हणून लोक धोनीला अधिक किंमत देतात, तुझ्यात आणि धोनीमध्ये हाच फरक आहे की त्याने कधी सन्मान मागितला नाही, तो त्याला मिळत गेला आणि तू कायम मागत राहिलास, धोनीचा षटकार भारी होता’ या आणि अशा अनेक कमेंट गंभीरच्या कव्हर फोटोवर पहायला मिळत आहेत.
दरम्यान, जेव्हा जेव्हा २०११च्या विश्वचषकासंदर्भात बोलले जाते तेव्हा धोनीने केलेली ९१ धावांची नाबाद खेळी आणि षटकार लगावत जिंकून दिलेल्या सामन्याबद्दलच बोलले जाते. मात्र त्याच तुलनेत गंभीरने श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात खेळलेल्या ९७ खेळीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे गंभीरचे चाहते म्हणतात. तसेच भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या नेतृत्त्वावर गंभीरनेही अनेकदा शंका उपस्थित केली आहे. गंभीरच्या म्हणण्याप्रमाणे धोनीला वारसा म्हणून चांगला संघ मिळाला होता. त्यामुळे त्याला नेतृत्त्व करणे अधिक सहज होते.