संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

धनुष्यबाण सेनेपासून हिरावू शकत नाही
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमचीच खरी शिवसेना म्हणणार्‍या बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले की, शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे याबाबत शिवसैनिकांनी मनात कोणताही संभ्रम ठेऊ नये, हे मी घटनातज्ज्ञांशी बोलून तुम्हाला सांगतो आहे. धनुष्यबाण शिवसेनेकडेच राहणार आहे. शिवसेना पक्ष देखील कुणीही घेऊन जाऊ शकत नाही, कायद्याने ते शक्य नाही, असे उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना चांगलेच ठणकावले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना काही अशी गोष्ट नाहीये की कुणीतरी घेऊन पळत सुटला. कुणी चोरून नेऊ शकेल अशी शिवसेना नाही. विधिमंडळ पक्ष किंवा रस्त्यावरचा पक्ष हा जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरत असतो. मग त्या पक्षाच्या माध्यमातून हे लोकप्रतिनिधी निवडून जात असतात. समजा की कधीकाळी एखादा आमदार पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष संपतो का? सगळे आमदार जरी गेले, तरी पक्ष संपू शकत नाही. आमदार जाऊ शकतात, पक्ष जाऊ शकत नाही. हा संभ्रम निर्माण केला जात आहे. मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही त्यांच्या भ्रमामध्ये अडकू नका. विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा असतो. त्यात असंख्य मतदार, पदाधिकारी, सदस्य असतात. त्या पदाधिकार्‍यांना हे असंच उचलून कुणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळ्यांना पैशांच्या दमदाटीवर कुणी घेऊन जाऊ शकत नाही. सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे 15-16 आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतुक करायचंय. अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय होतोच. आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलतायत.

या लोकांना आजही उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल आणि मातोश्रीबद्दल प्रेम आहे. खरंच धन्य झालो. ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. ‘शिवरायांचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेल्या धृतराष्ट्राचं राज्य नाही,’ असेही ठाकरे यांनी शिंदे गटाला खडसावलं.
उद्धव ठाकरे म्हणाले, कालपासून मी अनेक शिवसैनिकांशी संवाद साधतो आहे. सगळ्यांच्या भावना दाटून आल्या आहेत. लोकांवरील दडपण हलकं करणं माझं काम आहे. शिवसैनिकांवर दडपण वाढेल असं मी बोलणार नाही. पण कालच्या भेटीगाठीतील चर्चेतून शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेत नाही. चिन्हाबाबतची चिंता सोडा. लोक धनुष्यबाणचं नव्हे तर उमेदवारही पाहतात. काल मी शिवसैनिकांना गेल्या काळात काय काय झालं होतं ते काल सांगत होतो. त्यामुळे त्याचा अर्थ असा होत नाही की आमचं चिन्ह जाणार आहे. दुसरं म्हणजे फोटो येत आहेत की एवढे नगरसेवक गेले, तेवढे नगरसेवक गेले, पण असं नाहीए. कारण सध्या महापालिका अस्तित्वात नाहीत. त्यामुळे म्हटले तर हे त्यांचे व्यक्‍तिगत कार्यकर्ते असतील, ज्यांना आम्ही निष्ठावंत म्हणून उमेदवारी दिली होती, ते गेले असतील. शिवसेना भवनात साधेसाधे शिवसैनिक येत होते. कालपरवापर्यंत शिवसेना भवनात राज्यातील शिवसैनिक महिला आल्या होत्या आणि त्या वाघिणीप्रमाणे बोलत होत्या. तळहातावर पोट असणारी साधी लोकं येत आहेत आणि रडत आहेत. शिवसेनेनं साध्या व्यक्तींना मोठं केलं. पण जी मोठी झाली ती गेली. पण मोठ्या मनाची ही साधी माणसं जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत शिवसेनेच्या भवितव्याला धोका पोहोचू शकत नाही. उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा न्यायदेवतेवर विश्‍वास आहे. येत्या 12 तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami