संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

देशाच्या गळीत हंगामाचा बिगुल यंदा कर्नाटकातून

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर : देशाच्या ऊस गळीत हंगामाचा बिगुल यंदा कर्नाटकातून वाजणार आहे. कर्नाटकातील साखर कारखाने १ ऑक्टोबरपासून २०२२-२३ च्या गाळपास सुरुवात करतील. या पाठोपाठ महाराष्ट्रातील कारखाने १५ ऑक्टोबरला तर उत्तर प्रदेशातील कारखाने १ नोव्हेंबरला आपला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे. यानंतरच देशातील अन्य राज्यांत ऊसतोडणीस प्रारंभ होणार असल्याचे समजते. यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या विविध राज्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. देशात यंदा कर्नाटकातून पहिल्यांदा ऊसगाळप सुरू होईल, असे साखर उद्योगातील सूत्रांकडून समजते. मात्र महाराष्ट्रामध्ये लम्पी स्कीन आजाराचा फटकाहि हंगामाच्या प्रारंभी बसू शकतो असे काही कारखानदारांचे मत आहे.

सविस्तर वृत्त असे की, दरवर्षी कर्नाटक व महाराष्ट्रातील ऊस हंगामामध्ये दिवसांचा फरक असतो. यंदा मात्र महाराष्ट्रत पाऊस असल्याने राज्यातील ऊस हंगाम १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय मंत्री समितीने घेतला आहे. तर कर्नाटकात अतिरिक्त ऊस असल्याने एक ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीन लाख हेक्टर क्षेत्रावर जादा ऊस आहे.यंदा ५८ लाख हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी होईल,असा अंदाज वर्तवला जात असल्याने व नवीन इथेनॉल प्रकल्प उभे राहिल्याने ४५ लाख टन साखर इथेनॉलमध्ये रूपांतरित करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे त्यामुळे साखरेचे निव्वळ उत्पादन ३५४ लाख टन होईल, असा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कर्नाटकातील हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. तयारी सुरू असली तरी कर्नाटक सीमा भागातील कारखान्यांना लम्पी स्कीनचा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील साखर कारखाने ऊस वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील बैलगाड्यांचा वापर करतात.

महाराष्ट्रामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव असल्याने बैलांच्या दळणवळणावर मर्यादा आल्या आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात तरी कितपत बैलगाड्या उपलब्ध होतील याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. याचा फटका हंगामाच्या प्रारंभी बसू शकतो, असे देखील सीमा भागातील एका कारखान्याच्या प्रतिनिधीने सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami