मुंबई- आयपीएस अधिकारी देवेन भारती यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपांच्या चौकशी अहवाल सरकारने फेटाळून लावला आहे. माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी हा चौकशी अहवाल सरकारला सादर केला होता.देवेन भारती यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप गुन्हेगार विजय पालांडे याने केला होता.
गुन्हेगार विजय पालांडे याने देवेन भारती यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी संजय पांडे यांनी केली होती.तसे पाहिले तर हे प्रकरण जुने आहे. अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या विजय पालांडे नावाचा एक गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध खुनाच्या दोन प्रकरणाची चौकशी सुरू आहे.याच विजय पालांडे याला देवेन भारती हे मुंबई क्राईम ब्रँचमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना अटक केली होती.याच आरोपीने २०१८ साली असे आरोप केले होते की,देवेन भारती यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत आणि त्याचा पोलीस कारवाई करताना त्याचा वापर करतात. या आरोपांसंदर्भात २०२० मध्येच चौकशी समितीने आपला अहवाल दिला होता.त्यात म्हटले होते की, देवेन भारती यांचे तसे कोणतेही अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे समोर येत नाही. त्यामुळे ही चौकशी फाइल बंद करण्यात आली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यासंदर्भात पुन्हा एकदा चौकशीचे आदेश दिले.त्यानुसार तत्कालिन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ही चौकशी करून अहवाल तयार केला होता. त्यात देवेन भारती यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत.तो अहवाल सरकारकडे सादर करण्यात आला होता.मात्र आता हा अहवाल सरकारने फेटाळून लावला आहे.