*३१ ऑक्टोबरपर्यंत अहवाल देण्याचे जलस्रोतमंत्र्यांचे आदेश
पणजी- दक्षिण गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर नदीचे पाणी पुन्हा गढूळ होऊन लाल झाल्याचा प्रकार चार दिवसापूर्वी समोर आला होता.हे पाणी नेमके असे गढूळ कसे होते याचा शोध घेण्यास जलस्रोत खात्याला यश आले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर आता या इशाऱ्याची दखल घेत या दूधसागर नदीच्या गढूळ पाण्यासंदर्भात विशेष समिती नियुक्त केली असल्याची माहिती राज्याच्या जलस्रोत खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.दरम्यान,आता ३१ ऑक्टोबरपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत.
हे पाणी लाल कसे होते याचा शोध त्वरित लावावा अन्यथा संबंधित खात्यावर धडक मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा दाभाळ येथील ग्रामस्थांनी दिला होता. दूधसागर नदीचे पाणी गढूळ होण्याचे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याने परिसरातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.ओपा प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा विविध तालुक्यात केला जात असल्याने गढूळ पाण्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो.राज्यातील खाणी बंद असूनही पावसाळ्यात दूधसागर नदीत गढूळ पाणी वाहत असल्याने स्थानिकांत संभ्रम निर्माण झाला आहे.काले, करमणे नदीचे लाल पाणी दूधसागर नदीत मिसळत आहे. आम्हाला पाणीपुरवठा करणारा पंप नदीत बसविण्यात आला आहे. फिल्टर आहे, पण तो वारंवार बंद पडत आहे. परिणामी गढूळ पाणीपुरवठ्यामुळे आमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार आहे.संबंधित खात्याने आम्हाला शुद्ध पाणी पिण्यासाठी द्यावे अशी मागणी गुरू गावकर, किर्लपालचे पंच यांनी केली आहे.तर काल गुरूवारी धारबांदोडा येथे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले की,धारबांदोडा तालुक्याचे मामलेदार यांच्यासह तीन ग्रामपंचायतीचे सरपंच आणि जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांच्या एका समितीची निवड करण्यात आली असून ही समिती हे पाणी नेमके कशामुळे गढूळ होत आहे याचा शोध घेणार आहे.मंत्र्यांच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे.