दुबई – जगातील सर्वात उंच दुबईच्या बुर्ज खलिफा जवळच्या ३५ मजली इमारतीला सोमवारी भीषण आग लागली. त्यात मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र यात कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशामन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. आगीचे कारण समजलेले नाही.
जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफाजवळ विकासक ‘एमार’च्या ‘८ बुलेवार्ड वॉक’ नावाच्या टॉवर्स मालिकेतील ३५ मजली इमारत आहे. या इमारतीला सोमवारी आग लागली. खालच्या मजल्यावर लागलेली ही आग झपाट्याने इमारतीत पसरली. आगीची माहिती मिळतात अग्निशामन दलाचे जवान व आपत्कालीन सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. त्याचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. प्रशासनाने वेळीच आगीची माहिती अग्निशामन दलाला दिल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.