दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये आज दुपारी 2:28 वाजता 30 सेकंद भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.भूकंपाची तीव्रता 5.8 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कालिका येथून 12 किमी अंतरावर होता. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत आणि चीनपर्यंत पसरला. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून राजधानीत भूकंपाची ही तिसरी घटना आहे. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
दिल्लीत कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना भूकंपाचे चांगलेच हादरे जाणवले. दिल्लीसह उत्तर प्रदेशातील संभल, मुरादाबाद, अमरोहा आणि रामपूर येथे दुपारी अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग, चमोली आणि हल्दवानीसह, उत्तरकाशी जिल्ह्यातील भटवाडी, मणेरी आणि चिन्यालीसौर भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. शाहजहांपूरमध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले. बरेलीमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.
याआधी ५ जानेवारीला दिल्ली-एनसीआर आणि काश्मीरमध्ये संध्याकाळी ७.५६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.9 इतकी होती. त्याचे केंद्र होते, अफगाणिस्तानमधील फैजाबादपासून 79 किमी अंतरावर हिंदुकुश क्षेत्रात त्याचा केंद्रबिंदू होता.