नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीतील प्राथमिक शाळा उद्या ५ नोव्हेंबरपासून बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इयत्ता 5 वी वरील वर्गांसाठी सर्व आउटडोर उपक्रमांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीत वाहनांसाठी सम-विषम नियम लागू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांना दिल्लीतील प्रदूषणाची पातळी कमी होईपर्यंत दिल्लीतील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तात्पुरत्या बंद करण्याचे आवाहन केले आहे. खंडेलवाल म्हणाले की, हवाई निर्देशांक 450 च्या पुढे गेल्याने दिल्लीतील प्रदूषणाची भीषण स्थिती दिसून येते. संपूर्ण दिल्ली रेड झोनमध्ये असून ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत सर्व संभाव्य खबरदारीच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.कार्यालयात न जाता घरून कामाला चालना दिल्यास आणि शाळांनाही ऑनलाइन शिक्षण घेण्यास सांगितले तर ते योग्य ठरेल. प्रदूषणामुळे श्वास घेताना विषारी हवा शरीरात गेल्याने आरोग्याला धोकाफायक आहे. ही परिस्थिती विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी वाईट आहे.