अभिनेत्री हेमलता बाणेचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म ४ जून १९८९ मुंबई येथे झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या होतकरू नायिकांमधील एक प्रमुख चेहरा म्हणजे हेमलता बाणे. हेमलताचं शिक्षणही मुंबईतच झालं. लहानपणापासून नृत्याची विशेष आवड असल्याने हेमलताने नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तिने इयत्ता सातवीत असतानाच ‘मस्ताना’ हा स्टेज शो केला. कॉलेज मध्येही हेमलताने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. ईटीव्ही मराठी वाहिनीवरील झुंज मराठमोठी या कार्यक्रमाद्वारे तिला कलाक्षेत्रात पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर आलेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमानेही तिला लोकप्रियता मिळवून दिली. पुढे ४०० हुन अधिक अल्बममधून काम केले त्यातील “रेतीवाला नवरा पाहिजे” या अल्बमला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.
त्यानंतर काही चित्रपटांमध्ये तिने आयटेम सॉंग्ज केले. आम्ही सातपुते, इवलासा खोपा,नवरा माझा भवरा, चल धर पकड, कॅरी ऑन देशपांडे, मोहर, सत्य सावित्री आणि सत्यवान, लावू का लाथ, चिरगुट, साहेब यासारख्या चित्रपटातून तिने प्रमुख भूमिका बजावल्या. मानाचा मुजरा, झुंज मराठमोळी यासारख्या शोमध्येही तिने सहभाग दर्शवून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यामुळे या काळात तिने एक आघाडीची नायिका म्हणून आपले नाव मराठी सृष्टीत कोरले होते. हेमलता आता अभिनय क्षेत्रात फारशी दिसत नसली तरी निर्मिती क्षेत्रात तिने पाऊल टाकले आहे. गुलनार या तमाशावर आधारलेल्या नाटकाचीही ती निर्माती आहे. हेमलता बाणे ही एके काळची आघाडीची नायिका अर्चना पाटकर यांची सून आहे. हेमलता बाणेने आदित्य पाटकर यांच्या सोबत लग्न केले आहे. आदित्य पाटकर हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. यातुन तो हिंदी मालिकेसाठी काम करताना दिसतो. डायरेक्टर ऑफ फोटोग्राफीचा दांडगा अनुभव ही त्याला आहे.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३