आज प्रसिद्ध छायाचित्रकार जगदीश माळी यांचा स्मृतीदिन. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९५४ रोजी मुंबईत झाला. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांना वेगवेगळ्या पद्धतीने कॅमेऱ्यात कैद करणारे ज्येष्ठ छायाचित्रकार म्हणून त्यांची ओळख होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबात माळी यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना छायाचित्रणाची प्रचंड आवड होती. या आवडीमुळेच त्यांनी कधी शिक्षणात रस घेतला नाही. उत्तम छायाचित्रकार होण्याची त्यांची लहानपणापासूनची इच्छा होती. ‘सिने ब्लिट्झ’मुळे त्यांना त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणता आले.
१९७५मध्ये ‘सिने ब्लिट्झ’ या मासिकाने सिनेमातील कलाकार आणि त्यांच्या कहाण्या तिखट-मीठ लावून सांगायला सुरुवात करत ‘गॉसिप’ला एका वेगळया टप्प्यावर नेले. याच मासिकात जगदीश माळी यांनी छायाचित्रकार म्हणून सुरुवात केली. त्यामुळे अनेक बॉलिवूड कलाकारांशी त्यांचा संबंध आला. छायाचित्रणात तरबेज, हसरा चेहरा आणि कलाकारांबरोबरचा सहज वावर यामुळे जगदीश माळी अल्पावधीतच चांगले छायाचित्रकार म्हणून ओळखले जाऊ लागले. याच भांडवलावर त्यांनी छायाचित्रणाचा स्वतंत्र स्टुडिओ चालू करून छायाचित्रण सुरू केले. अभिनेत्री रेखाची त्यांनी छायाचित्रे काढली होती. रेखाला ती इतकी आवडली की, त्यानंतर जगदीश माळी यांच्याकडून रेखा छायाचित्रे काढू लागली आणि इतरांनाही त्यांच्याकडून छायाचित्रे काढण्यासाठी शिफारस करू लागली. प्रथम समांतर चित्रपटांमधून सुरुवात करणा-या कलाकारांना व्यावसायिक चित्रपटांमध्ये सहजासहजी प्रवेश मिळत नसे. अनुपम खेर, शबानी आझमी, ओम पुरी यांच्यासारख्या कलाकारांचे सुरुवातीचे छायाचित्रण करून त्यांचा व्यावसायिक चित्रपटांमध्ये प्रवेश सुकर करण्याचे काम माळी यांनी केले. अमिताभ बच्चन, आमिर खान ते प्रीती झिंटा, दीप्ती भटनागर अशा नवीन पिढीच्या अनेक कलाकारांचेही त्यांनी छायाचित्रण केले. त्याचबरोबर जाहिराती, मॉडेल, नवोदित तारका छायाचित्रणापासून ते म्युझिक अल्बमचेही त्यांनी दिग्दर्शन केले. कृष्णधवल छायाचित्रे काढण्यात त्यांचा हातखंडा होता. जगदीश माळी हे अभिनेत्री अंतरा माळीचे वडील होत. जगदीश माळी यांचे १३ मे २०१३ रोजी निधन झाले.
– संजीव वेलणकर
९३२२४०१७३३