संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 09 February 2023

दिनविशेष! पुण्याचे भूषण असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा वाढदिवस

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आज पुण्याचे भूषण असलेल्या #बालगंधर्व_रंगमंदिराचा वाढदिवस.
पुण्यातील रसिकांची दाद प्रत्येक कलाकारासाठी एक अलंकार असतो. त्यात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिरातील दाद म्हणजे कलाकारांच्या कलेचे सार्थक झाल्यासारखे असते. पुण्यात दाद मिळाली की जगात कुठेही दाद मिळवता येते, असे अनेक कलाकार आवर्जून सांगत असतात, हीच खरी पुण्याची व पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराची खासीयत आहे. बालगंधर्व रंगमंदिराचा आदर्श राज्यातील विविध शहरांमध्ये नाटय़गृहांची उभारणी करण्यात जपला गेला आहे. स्वातंत्र्या नंतर स्वतंत्र रंगमंदिराच्या उभारणीला प्राधान्य देणारी पुणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली होती. संगीत रंगभूमीसाठी आपले जीवन वेचणारे नटसम्राट नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी साकारण्यात आलेल्या या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ सप्टेंबर १९६२ रोजी बालगंधर्व यांनीच केले होते. बालगंधर्व रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांची प्राणज्योत मालवली. पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले होते. ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेशातील आणि पुरुष वेशातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली. विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे. कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार पु लंनी केला आणि त्या काळी एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले. बी. जी. शिर्के यांनी या रंगमंदिराच्या बांधकामाची जबाबदारी घेऊन अवघ्या पंधरा लाखात बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली.
बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. तेव्हाचे महापौर ना. ग. गोरे व पु. ल. देशपांडे यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम नेटका होईल याकडे लक्ष दिले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले आचार्य अत्रे उपस्थित राहू शकले नाहीत. पण, ‘मराठा’तील अत्रे यांच्या अग्रलेखाचे वाचन ना. ग. गोरे यांनी केले होते. पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे, ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार आणि जयराम शिलेदार या दिग्गज कलाकारांनी नांदी सादर केली होती.
तर, दुसऱ्या दिवशी ‘एकच प्याला’ नाटकाचा प्रयोग सादर झाला होता. तेव्हापासून हे रंगमंदिर पुणेकरांच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. या रंगमंदिरामध्ये नाटकाचा प्रयोग करण्याचा आनंद आणि रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविण्यासाठी रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आसुसलेला असतो. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये प्रयोग करणे ही जणू कलाकाराच्या जीवनातील भाग्याची गोष्ट असते.
बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी या परिसराचे वर्णन करीत नेमके निरीक्षण आपल्या ओघवत्या शैलीत मांडणाऱ्या पु.ल. देशपांडे यांचे भाषण गाजले होते. पुलं म्हणाले होते, इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातील स्त्री म्हणजे झाशीची राणी आहे आणि आतल्या बाजूला देऊस्करांनी चितारलेला स्त्री वेशातील पुरुष म्हणजे गंधर्व आहेत. अर्धनारी नटेश्वराची दोन रूपं जिथं आहेत तिथं हे नटेश्वराचे मंदिर उभारलं जातंय, ही आनंदाची गोष्ट आहे. अलीकडे ‘नटेश्वर’ आहे, पलीकडे ‘ओंकारेश्वर’ आहे; मधून जीवनाची सरिता वाहतीये. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. माझी विनंती आहे, की हा पूल एकतर्फी असू द्या.. ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा!

संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami