आज मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजीचा. भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले. भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या “दोस्त हो” आणि “जिंदादिल” या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले. आपल्या समुहातर्फे भाऊसाहेब पाटणकर यांना आदरांजली.
– संजीव वेलणकर
९४२२३०१७३३