आज मराठी नाट्यलेखक, नाट्यअ्भिनेते व नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १४ जुलै १९६४ पुणे येथे झाला. अतुल पेठे गेली ३८ हून अधिक वर्षे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशा विविध भूमिकांमधून परिचित आहेत.
अतुल पेठे यांची नाटके अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात सहभाग झाली आहेत. ‘रिंगणनाट्य’ आणि ‘मानसरंग’ या संकल्पनांचे जनक म्हणून अतुल पेठे सुपरिचित आहेत.
नाटक ही केवळ करमणूक आणि मनोरंजन करणारी कला नसून ती प्रत्येकाला आत्मभान देणारी, विचारप्रवृत्त करणारी एक गंभीर कला आहे, हे लक्षात येत असतानाच अतुल पेठे रंगभूमीवर अवतीर्ण झाले आणि त्यांनी आपले सारे आयुष्य याच कलेसाठी वेचायचे ठरवले. अतुल पेठे यांचा दहावीपर्यंत नाटकाशी काहीही संबंध नव्हता. शाळेचा प्रचंड राग होता. सुरवातीला ते पुण्यातील शनिवारपेठेत राहात असत. मग काही वर्षांनी ते कोथरुडला राहायला गेले. तेथील शाळेत आपण कविता लिहू शकतो याची जाणीव त्यांना झाली. त्याचवेळी आंतरशालेय नाट्यस्पर्धा होती त्यात त्यांना बाईंनी काम दिलं आणि तेथे अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं. तिथं अतुल पेठे यांना अभिनयाची दिशा सापडली. पुढे त्यांचे काका शिशूरंजन या संस्थेत घेऊन गेले. पुढे अतुल सापडेल त्यावर नाटक लिहीत असे.समतानंद अनंत हरी गद्रे हे अतुल पेठे यांचे आजोबा होत.पत्रकार, संपादक, नाटककार आणि समाजसुधारक अशा चार क्षेत्रात त्यांनी अफाट कर्तृत्व गाजवले.
पंचवीसव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. महाविद्यालयीन जीवनात पुण्यातील पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यशाचा पहिला जरीपटका मिळवल्यानंतर पेठे यांनी विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाण्याचे ठरवले.
‘शीतयुद्ध सदानंद’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘गोळायुग’, ‘दलपतसिंग येती गावा’ यांसारख्या नाटकांनंतर त्यांनी सादर केलेले ‘सत्यशोधक’ हे गो. पु. देशपांडे यांचे महात्मा फुले यांच्यावरील नाटक रंगमचीय क्षेत्रात चर्चेत राहिले होते. ते अभिनय करतात, तरी दिग्दर्शन हे त्यांचे खरे क्षेत्र. नव्या पिढीशी सतत संपर्कात राहून त्यांच्यात रंगभूमीची जाण निर्माण करण्यासाठी पेठे राज्यभर नाटय़कार्यशाळा घेत असतात. ‘सत्यशोधक’ हे नाटक अतुल पेठे यांनी पुणे महापालिकेतील अभिनयाची पार्श्वभूमी नसलेल्या सफाई कामगारांना घेऊन केले. ‘दलपतसिंग..’ हे माहितीचा अधिकार या विषयावरचे नाटक दुर्गम खेडय़ातील कलाकारांना घेऊन केले.
कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अतुल पेठे यांनी ‘रिंगणनाट्य’ कार्यशाळा घेतल्या. त्यातून अडीचशे कार्यकर्त्यां कलावंतांनी १६ नाटके सादर केली. त्या नाटकांचे एक हजाराच्या आसपास प्रयोग झाले. एकांकिका लेखन हा त्यांचा जसा प्रांत आहे, तसेच नाटय़रूपांतराच्या मार्गानेही त्यांनी नाटय़लेखनात रस घेतला आहे. विजय तेंडुलकर यांच्यावर त्यांनी तयार केलेला ‘तेंडुलकर आणि हिंसा – काल आणि आज’ हा माहितीपट विशेष गाजला. ‘नाटककार सतीश आळेकर’, ‘बहिणाई’, ‘अशोक केळकर’ यां सारख्या माहितीपटांमध्ये त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. मात्र ‘कचरा कोंडी’ या कचऱ्याच्या समस्येवर आणि त्यामध्ये काम करणाऱ्यांच्या जगण्याबद्दल समाजाचे डोळे उघडणाऱ्या माहितीपटाने पेठे यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले.
आकाशवाणीवर ‘कोसला’ कादंबरीचे वाचन असो, की अरुण कोलटकरांच्या कवितांचे वाचन करायला; पेठे ‘तयार’ असतात. अतुल पेठे यांना डिसेंबर २०१८ मध्ये ‘तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तसेच कोलकात्याच्या ‘ब्रात्तोजान’ नाटय़संस्थेचा ‘विष्णु बासू स्मृती पुरस्कार’ अतुल पेठे यांना मिळाला आहे. पेठे यांना प्रयोगशील रंगभूमीवरील कामाबद्दल कोलकात्यात मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कलाजीवनातील एक महत्त्वाचा पुरस्कार म्हटला पाहिजे.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.