भारतीय वंशाचे इंग्लिश लेखक रस्किनबाँड यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म १९ मे १९३४ हिमाचल प्रदेशातील कसौली येथे झाला.रस्किन बॉण्ड हे जगभर गाजलेले अँग्लो इंडियन लेखक.
देशातील सर्व भाषांतील वाचकांत प्रसिद्ध असलेल्या बाँड यांनी लहानपणीच अत्यंत खडतर आयुष्य म्हणजे काय, हे पाहिले. वडिलांचे अकाली निधन झाल्याने कोसळलेला दु:खाचा डोंगर त्यांच्यातील लेखक जागा करण्यासाठी प्रेरणादायी ठरला. त्यातूनच लिखाणाचा प्रवास सुरू झालेल्या बाँड यांच्या हातून ‘फ्लाइट ऑफ पिजन्स’, ‘द नाइट अॅट देवाली’, ‘द ब्लू अंब्रेला’, ‘रेन इन द माउंटन्स’ अशा साहित्यकृतींचा जन्म झाला पण बाँड ‘द रुम ऑन द रुफ’ या जगप्रसिद्ध साहित्यकृतीद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे साहित्यिक म्हणून नावाजले गेले.
कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बॉंड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किन ऊर्फ रस्टी यांचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. लहान रस्टी काहीसे अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होते. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण ते आणि त्यांचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टी यांना घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडे लावत.
रस्किन लहानपणी पुस्तकेही भरपूर वाचत असत. वडिलांनी त्यांच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. रस्किन यांनी त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. पुढे वडील त्यानंतर मलेरियाने वारले. मग आपल्या आई,आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षे जात राहिली. पण या सर्व काळात तो फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये रमले. आपल्या सोबतच्या दोस्तांना ते डायरीत लिहिलेले वाचून दाखवत असत आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे.
सिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आईने आग्रह धरला, की रस्टी यांनी आता लंडनला जावे. भारतात राहून मुलाचे भवितव्य घडणार नाही याची आईला ठाम खात्री होती. ब्रिटिश राज आता संपले होते आणि इथल्या बहुतेक सगळ्याच ब्रिटिश आणि अॅंयग्लो इंडियन कुटुंबांनी माघारी परतायची घाई चालवली होती. रस्किन यांच्या आयुष्यातला तो सर्वांत कठीण काळ होता. चित्र-विचित्र संमिश्र भावनांनी, काय करायचे या विचारांनी मन गोंधळून गेले होते. लेखक बनायची उर्मी मनाच्या तळाशी दाबून ठेवून, नुकत्याच तारुण्यात प्रवेश करणार्या 0रस्किन यांनी भविष्यातल्या इतर ‘सुवर्णसंधी’ आजमावून बघण्यासाठी शेवटी लंडनला प्रयाण केले. त्याच्या मनातल्या रस्टीने मात्र हिमालयाचा निरोप घेण्याचे साफ नाकारले. ते मनाने मागेच, त्याच्या छतावरील खोलीतून झर्याीकाठी पाणी प्यायला येणार्याा बिबळ्यावर नजर ठेवत, पिंपळाखाली मोडकी सायकल ठेवून बाजूच्या अक्रोडाच्या झाडावरच्या लांब शेपटीवाल्या माकडांच्या खोड्या काढत राहिले. लंडनमध्ये रस्किन कॉलेजात गेले, त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीपासून ते फोटोंच्या दुकानातील विक्रेत्यापर्यंत विविध नोकर्या केल्या आणि त्या वर्षांतल्या प्रत्येक दिवशी मनातला रस्टी हिमालयाच्या कुशीतल्या त्याच्या गावात परतण्यासाठी झुरत राहिले. त्यांना भारतातल्या हवेची, झाडांची, मित्रमैत्रिणींची, बाजारातल्या शेंगदाणेवाल्याची, बेकरीवाल्याच्या मुलीची आणि अंगणातल्या मेपलच्या ढोलीमधल्या झुबकेदार शेपटीच्या खारीची सतत आठवण येत राहिली. मनाच्या याच बेचैन अवस्थेत मग रस्किन यांनी एक दिवस ‘द रूम ऑन द रूफ’ लिहून काढले.
‘द रूम ऑन द रूफ’ या पुस्तकाने साहित्यवर्तुळात चांगलीच खळबळ माजवली. तरुण रस्किन यांच्या साध्या, सरळ आणि प्रामाणिक भाषेतल्या आठवणींची मोहिनी सामान्य वाचकांपासून ते समीक्षकांपर्यंत सर्वांवरच पडली. ब्रिटिश कॉमनवेल्थ साहित्यिकांसाठी असणारा प्रतिष्ठेचा ‘जॉन लेव्हलिन र्हिरस पुरस्कार’ त्यांना पदार्पणातच मिळाला. वयाच्या फक्त १७ व्या वर्षी अशी प्रसिद्धी व सन्मान मिळालेल्या रस्किन बॉंड यांचे भवितव्य लंडनला राहून इंग्रजी साहित्य जगतात आता लखलखीतपणे उजळणार, ह्यात काहीच शंका नव्हती. पण हातात पुरस्काराच्या रकमेचा चेक पडताच रस्किन यांनी पहिली गोष्ट केली, ती भारतात परतण्याचे तिकीट काढण्याची. लंडनच्या चार वर्षांमधे ज्या शांत, शुभ्र, असीम हिमालयाचे स्वप्न तो रोज पाहत होते, त्या हिमालयाकडे त्यांची पावले परत अपरिहार्यपणे वळली.
त्यांच्या कथा-कादंबऱ्याची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. तर त्यांनी ललित, ललितेतर आणि कवितांची अशी एकूण शंभराहून अधिक पुस्तके लिहिली आहेत.त्यांनी लहान मुलांसाठी ३०हून अधिक पुस्तके लिहिली.
रस्किन बॉंड यांच्या कथांवर चित्रपट निघाले आहेत, व त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले. ‘द फ्लाईट ऑफ पिजन्स’ या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला ‘जुनून’ आणि ‘द ब्लू अंब्रेला’ कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा चित्रपट काढला. एक था रस्टी’या नावाने त्याच्या ’रस्टी’कथांवर आधारलेली दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. ‘अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा’ या पुस्तकाला १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९ मध्ये रस्किन यांना पद्मश्री व २०१४ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला आहे.
रस्किन बॉंड यांचे आत्मचरित्र ‘Ruskin Bonds Lone Fox Dancing’ या नावाने प्रसिद्ध असून ‘आत्मरंगी’ या नावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद रमा हर्डीकर – सखदेव यांनी केला आहे.
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३