आज गझलसम्राट मेहदी हसन यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थानात झाला. मेहदी हसन यांनी गायनाचे धडे वडील उस्ताद अझीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं यांच्याकडून गिरविले. ते दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे कुटुंब वाद्यनिर्मिती उद्योगातही होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. पंजाब प्रांतातील चिचवटनी गावात ते स्थायिक झाले. पाकिस्तानात एका सायकलीच्या दुकानात ते काम करीत होते. नंतर त्यांनी मोटार आणि ट्रॅक्टार मेकॅनिकचेही काम केले. काम करीत असतानाही त्यांनी गायनाचे धडे गिरविणे सुरू ठेवले होते. पुढील काळात ते ठुमरी गायनाकडून गझल गायनाकडे वळले.
कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या हेतूने ते गझल गायनाचे कार्यक्रम करीत असत. गझल गायन सुरू केल्यानंतरही त्यांनी शास्त्रीय गायनाचा रियाझ कायम ठेवला होता. पाकिस्तान रेडिओवर पहिल्यांदा १९५७ मध्ये त्यांना ठुमरी गायनाची संधी मिळाली. नंतर त्यांनी पाकिस्तानी चित्रपटांसाठी गीतगायन सुरू केले. ‘गुलो में रंग भरीये‘ हे त्यांचे ‘फरंगी‘ या १९६४ च्या चित्रपटातील गीत त्यांचे पहिले चित्रपट गीत होते.
‘पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, ‘अब के हम बिछडे‘, ‘रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, ‘तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में…’ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहदी हसन यांनी रसिकांना दिल्या. अब के बिछडे आणि पत्ता पत्ता बुटा बुटा या त्यांनी गायलेल्या गझल विशेष लोकप्रिय होत्या. मेहदी हसन यांनी गझलेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मेहदी हसन यांचे १३ जून २०१२ रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– संजीव वेलणकर
९४२२३०१७३३