आज जागतिक संग्रहालय दिवस. संग्रहालयांची संकल्पना संग्रहित केलेल्या ठेव्याची महिती, नागरिकांना इतिहासातील घडामोडीची व ऐतिहासिक संशोधकांना अभ्यासपर माहिती मिळावी या उद्देशाने इंटरनॅशनल काऊन्सिल ऑफ म्युझियम यांनी १८ मे १९७७ हा दिन ‘जागतिक संग्रहालय दिन’ म्हणून साजरा करण्यास आरंभ केला.
संग्रह म्हटलं की छंद. सामान्य व्यक्ती एखाद्या गोष्टीकडे सीमित दृष्टीकोनातून पाहते पण त्याच गोष्टीकडे छंदवेडी व्यक्ती कल्पकतेने पाहते. छंद आयुष्यात ऊर्जा निर्माण करतो, असे मानणारे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कोणतातरी छंद बाळगायला हवा असे म्हणणारे आमचे बंधू दीपक वेलणकर यांचा विंटेज कारचा छंद.
‘विंटेज कार’ बाळगणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. याचा अर्थ ही हौस केवळ श्रीमंत माणसांचीच आहे, असेही नाही. मुख्य म्हणजे त्यासाठी गाडीवर प्रेम असावे लागते. ही गाडीसुद्धा इतर गाड्यांसारखी धातूपासूनच तयार झालेली असते. असे असले तरी हिचा सांभाळ करताना धसमुसळेपणा करून चालत नाही. तिला तळहातावरील फोडाप्रमाणे जपावे लागते. ती आहे तशीच राहावी यासाठी हरप्रकारे प्रयत्न करावे लागतात. एकीकडे अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या कितीही गाड्या बाळगल्या तरी ही गाडी अनमोल असते. इतर गाड्यांच्या बाबतीत आपण कितीही ‘रफ अँड टफ’ वागत असलो तरी व्हिन्टेज गाड्यांच्या बाबतीत मात्र ‘हँडल वुइथ केअर’ या धोरणाचा अवलंब करावा लागतो. पुण्यातील दीपक वेलणकर असाच विंटेज व क्लासिक कार आणि दुचाकीचा छंद बाळगून आहेत. गेली अठराहून अधिक वर्षे ते विंटेज कारचा छंद बाळगून आहेत. दीपक वेलणकर यांच्या कलेक्शनमध्ये १९४२ सालपासून ते १९६२ सालापर्यंतच्या विंटेज व क्लासिक गाड्या आहेत. तसेच १९५८ वेस्पा डग्लस ते १९८४ ची एन्फिल्ड मोपा अशा दुचाकी त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये १९३९ सालातील फियाट बलीला (७ सिटर), १९४७ सालची हिंदुस्थान 10, १९४९ सालीची स्कोडा, १९५४ सालची फियाट Milli Cento, १९५८ची लॅडमास्टर, १९६१ सालची मर्सडीझ 190 D, १९६२ सालची स्टॅन्डर्ड (ओपन) अशा मिळून जवळ जवळ १० ते १२ व्हिन्टेज कार व तेवढ्याच दुचाकी आहेत.
दीपक वेलणकर यांच्या मर्सडीझ 190 D अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ या चित्रपटात, फियाट ‘मी वसंतराव’ या चित्रपटात वापरल्या आहेत. त्यांच्या विंटेज कार्स व दुचाकी मेंटेन केल्याने अगदी कालच खरेदी केल्यासारख्या दिसतात. पुणे, मुंबई, गोवा येथे होणाऱ्या ‘व्हिंटेज कार’ रॅलीमध्ये ते नेहमी भाग घेतात. त्यांच्या विंटेज कारचे कायमस्वरूपी एक संग्रहालय करायचा विचार आहे. जागतिक संग्रहालय दिवसाच्या निमित्ताने दीपक वेलणकर यांच्या विंटेज कारच्या छंदाला सलाम.
दीपक वेलणकर – संपर्क. ९४२२३०१७३४
– संजीव वेलणकर
९४२२३०१७३३