संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

दिनविशेष! अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या जोहरा सेहगल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नााट्य आणि चित्रपट क्षेत्रावरही आपल्या लक्षणीय अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या, गेल्या पिढीतील ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा स्मृतीदिन. त्यांचा जन्म २७ एप्रिल १९१२ साहरनपूर येथे झाला.

पारंपरिक आणि सधन मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या जोहरा सेहगल यांचे बालपण त्यावेळच्या पडदा पद्धतीत गेले. पण त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली आणि सारे पारडे बदलले. ते एका अर्थी चांगलेच झाले कारण त्यामुळे भारतीय रंगभूमीला आणि चित्रपटसृष्टीला एका कसदार नृत्यांगणा आणि अभिनेत्री लाभली. सिनेसृष्टी गाजवणाऱ्या जोहरा सेहगल या मूळच्या नृत्यांगना होत्या. त्या युरोपमध्ये असतानाच त्यांना उदय शंकर यांचे शिव-पार्वती हे नृत्यनाटय़ पाहायला मिळाले व ते या शैलीकडे ओढले गेले.

उदय शंकर ट्रूपमधील त्या आघाडीच्या नृत्यांगना होत्या. या ट्रूपबरोबर त्यांनी जगाचा दौरा केला. १९३५ ते १९४३ या दरम्यान उदय शंकर यांच्या नृत्यनाट्य गटातील त्या आघाडीच्या नर्तिका होत्या. अमेरिका, जपान या देशांमध्ये त्यांच्या गटाने आपले कार्यक्रम सादर केले होते. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनच्या सदस्य असलेल्या जोहरा यांनी १९४६ साली धरती के लाल या चित्रपटाद्वारे चित्रपट कारकिर्दीस सुरुवात केली. अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

गुरुदत्त यांच्या “बाझी’ तसेच राज कपूर यांच्या “आवारा’ चित्रपटात त्यांनी नृत्य दिग्दर्शकेची भूमिका बजावली. पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये त्यांनी तब्बल १४ वर्षे वेगवेगळ्या भूमिका केल्या. विशेष म्हणजे त्यांनी कपूर घराण्याच्या चारही पिढ्यांबरोबर काम केले आहे. १९४२ मध्ये त्यांची ओळख कामेश्वेर सेहगल यांच्याशी झाली आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. आंतरराष्ट्रीय मंचावर परफॉर्म करणा-या जोहरा या पहिल्या भारतीय अभिनेत्री आहेत. त्यानी १९६०च्या दशकात रुडयार्ड किपलिंगच्या ‘द रेस्कयू ऑफ प्लूफ्लेस’मध्ये अभिनय केला होता.

१९९०च्या दशकात लंडनहून भारतात परतण्यापूर्वी जोरहा यांनी द ज्वेल इन द क्राऊन, माय ब्युटीफुल लाउंडेरेट, तंदुरी नाईट्स आणि नेवर से डाय या टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्येही काम केले होते. “हम दिल दे चुके सनम’, “वीर-झारा’, “चिनी कम’ या चित्रपटातील जोहरा सेहगल यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. २००७ साली त्यांनी “सावरिया” या चित्रपटात शेवटची भूमिका केली. जोहरा सेहगल यांना १९९८ मध्ये पद्मश्री, २००१ मध्ये कालीदास सन्मान, २००४ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि २०१० मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. हिंदी चित्रपटसृष्टीची आजी म्हणून त्यांची ओळख होती. जोहरा यांना किरण आणि पवन अशी मुले आहेत. जोहरा सेहगल यांचे १० जुलै २०१४ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami