औरंगाबाद- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी तथा माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कन्नडमध्ये आज मोर्चा काढला होता. पीक विमा मिळाला पाहिजे यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्या पूर्ण करा, यासाठीचा हा मोर्चा होता. मात्र हा मोर्चा सुरू असताना संजना जाधव यांचे विभक्त पती तथा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोर्च्याला विरोध करत खुर्ची टाकून रस्त्यात बसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली.
शेतकऱ्यांसाठी दानवे कन्या संजना जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले. कन्नड शहरातून आंदोलनाला सुरुवात झाली होती. यावेळी संजना जाधव यांचे विभक्त पती हर्षवर्धन जाधव यांनी या मोर्चाला आगळावेगळा विरोध करण्यासाठी खुर्ची टाकून रस्त्यात बसले. प्रसंगी जाधव यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मोर्च्याच्यावेळी झालेल्या या राजकीय नाट्यची चर्चा होत आहे. ‘शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य पूर्ण होत नसल्याने आपण आंदोलन करत आहोत. आंदोलनाची ही काही पहिलीच वेळ नाही, अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांसाठी आपण काम केलेले आहे. माझे वडील केंद्रीय मंत्री असल्याचे अभिमान आहे.’ असे संजना जाधव यांनी सांगितले.