मुंबई : दादर पूर्व भागातील एका रहिवासी इमारतीला आग लागण्याची घटना घडली. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आर. ए. रेसिडन्सी इमारत ४४ मजली असून ४२व्या मजली आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत कोणी जखमी झाले नाही. मात्र वित्तीय हानी झाली आहे. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती समोर आली.
ज्या भागातील इमारतीला आग लागली, त्या इमारतीत अग्निशमन यंत्रणा काम करत नव्हती. इमारतीची लिफ्ट बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्यांचा वापर करावा लागला. त्यामुळे आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता. आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवता आले नाही. आग विझवण्यासाठी १६ फायर इंजिन, ४ जंबो टँकर आणि १ क्रेन दाखल झाले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले.