मुंबई – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य चित्रपट लेखक-दिग्दर्शक काशिनाथुनी विश्वनाथ यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. बऱ्याच दिवसांपासून ते आजारपणाने त्रस्त असल्याने हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल होते. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट आणि राजकीय सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले.
१९ फेब्रुवारी १९३० रोजी मद्रासच्या रायपल्ले याठिकाणी त्यांचा जन्म झाला. विश्वनाथ यांनी १९५७ मध्ये ‘तोडीकोडल्लू’ चित्रपटासाठी ऑडिओग्राफर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. त्या चित्रपटादरम्यान त्यांच्या कामाची दखल घेत दिग्दर्शक अदुर्थी सुब्बाराव यांनी विश्वनाथ यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून संधी दिली. विश्वनाथ यांनी अक्किनेनी यांच्या ‘इदारुमित्रुलु’, ‘चादुवाक्वाना टेट्रिलू’, ‘मूगामनसुलु’ आणि ‘डॉक्टर चक्रवर्ती’ सारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. शोभन बाबू यांच्या ‘चेलेली कपूरम’.या चित्रपटामुळे ते ‘कलातपस्वी’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना प्रचंड पुरस्कार मिळाले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार तसेच पदमश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.