चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील पाटागुडा या गावातील विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला होता. पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत दांडी बहाद्दर शिक्षक येतच नाहीत, यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी व्हिडीओत तक्रारी केल्या होत्या. ‘आम्हाला शिक्षक द्या हो शिक्षक’ असे म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनीच एकत्र येत रस्त्यावर उतरून रस्तारोके आंदोलन केले.
विद्यार्थ्यांनी वाहतूक अडवून धरली आणि घोषणाबाजी केली. जिवती तालुक्यातील पाटागुडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक वारंवार गैरहजर राहतात. रजा मंजूर नसतानासुद्धा शाळेत येत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शाळेसमोर रास्ता रोको आंदोलन केले. मुलांना दुपारचे जेवणही नव्हते भर उन्हात चटके सहन करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी आंदोलन केले.
पाटागुडा येथील जि.प. शाळा इयत्ता सातवीपर्यंत असून ७२ एवढी पटसंख्या आहे. सदर शाळेतील शिक्षक कधी सुटीवर तर कधी अवेळी येतात. रजा मंजूर नसतानादेखील सुटीवर जातात. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.