मुंबई- दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी राज्य मंडळ विशेष काळजी घेत आहे. या परीक्षांदरम्यान होणारी पेपरफुटी किंवा कॉपी रोखण्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. अशात राज्य मंडळाने नवा नियम काढला असून ज्यात, परीक्षा केंद्रापासून १०० मीटर अंतरावरील झेरॉक्स दुकाने बंद राहणार आहेत. परीक्षा काळात झेरॉक्स दुकानांवर विद्यार्थ्यांचा घोळका असतो. येथे विद्यार्थ्यांना मिनी कॉपी पुरवल्या जातात. ज्यातून सहज कॉपी केली जाते. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटरच्या परिसरात असलेली सर्व झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर केंद्रा बाहेर कॉपी पुरविणाऱ्यांची टोळी असल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. परिणामी १४४ कलम सुद्धा लागू करण्याची शक्यता आहे. कॉपीमुक्त अभियान राबवण्याकरीता परीक्षे आधी, परीक्षेदरम्यान आणि परीक्षेनंतर कोण कोणती कार्यवाही करावी, या संदर्भात राज्यमंडळाने परिपत्रक जारी केले आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक असणार आहे. तालुक्यांमध्ये केंद्रांची संख्या जास्त असल्यास जास्त पथके केंद्रावर तैनात करण्यात येतील.