संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 29 March 2023

दसरा मेळाव्यांमुळे वांद्रे आणि मध्य मुंबईत आज वाहतूक निर्बंध

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा वांद्रे येथील बीकेसी मैदानात होणार आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत. मध्य मुंबई आणि वांद्रे येथील प्रवासासाठी उद्या बुधवारी हे निर्बंध आहेत. त्यात काही मार्गांवर वाहनांना प्रवेश बंदी असून काही मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवली आहे.
दसरा मेळाव्यामुळे दादर आणि परिसरातील काही मार्गांवर बुधवारी सकाळी ९ ते मध्यरात्रीपर्यंत वाहने उभी करण्यास वाहतूक पोलिसांनी मनाई केली आहे. दादरमधील केळुस्कर मार्ग, एम. बी. राऊत रोड, एस. व्ही. रोड, दादासाहेब रेगे मार्ग, सेनापती बापट पुतळ्यापासून गडकरी जंक्शन, दिलीप गुप्ते मार्ग, शिवाजी पार्क गेट क्रमांक ४ पासून शितलादेवी मंदिर जंक्शनपर्यंत, एन. सी. केळकर मार्गावरील गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन, एल. जी. रोड राजाबढे सिग्नल ते गडकरी जंक्शन येथे वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन माहीमपर्यंत एस. व्ही. रोडवरील वाहनांना प्रवेश नाही. राजा बधे चौक जंक्शनवर केळुसकर मार्गापर्यंत वाहनांना प्रवेश नाही. दिलीप गुप्ते रोडवर पांडुरंग नाईक मार्गावरील जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. गडकरी चौक जंक्शनवर केळुस्कर रोडवरील सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शन, दादासाहेब रेगे रोडवर आणि बाल गोविंदास मार्गावर पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शनपासून एल. जी. मार्गापर्यंत वाहनांना प्रवेश बंदी आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे सकाळी ९ ते मध्यरात्री पर्यंत दसरा मेळाव्यासाठी लोकांना घेऊन जाणारी वाहने वगळता अन्य वाहनांना निर्बंध लागू केले आहेत. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे धारावी आणि वांद्रे वरळी सी लिंक मार्गे कौटुंबिक न्यायालयाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. संत ज्ञानेश्वर रोड, बीकेसी आयकर जंक्शन येथून कुर्ल्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. सरकारी वसाहत वाल्मिकी नगर येथून बीकेसी परिसरातून चुनाभट्टी आणि कुर्ल्याकडे वाहनांना प्रवेश नाही. सुर्वे जंक्शन मार्गे पश्चिम महामार्ग धारावी आणि वरळी सी-लिंककडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. बीकेसीवरून चुनाभट्टीमार्गे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. वेस्टर्न हायवे, वांद्रे-वरळी सी- लिंक येथून बीकेसीकडे येणारी वाहने फॅमिली कोर्ट जंक्शन येथून यू टर्न घेतील. संत ज्ञानेश्वर नगर बीकेसी येथून गुरुनानक हॉस्पिटल कलानगर जंक्शन मार्गे धारावी जंक्शन मार्गे ती कुर्ल्याकडे जातील. ५ ऑक्टोबरपूर्वी जारी केलेले वाहतुकीतील बदल आणि निर्बंध 5 ऑक्टोबरला सकाळी ९ ते मध्यरात्रीपर्यंत लागू असतील, असे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या