श्योपूर :- प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत यापूर्वी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणले गेले. पंतप्रधान यांच्या उपस्थितीत हे चित्ते मध्य प्रदेश येथील कुनो नॅशनल पार्क मध्ये सोडण्यात आले होते. दरम्यान, आज पुन्हा हवाई दलाच्या विशेष विमानाने दक्षिण आफ्रिकेकडील नामिबियामधून आणखी १२ चित्ते भारतात दाखल झाले. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या चित्त्यांचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्वागत केले. तसेच यांच्या हस्ते या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी रवाना झालेले चित्ते आज मध्य प्रदेशातील ग्वालियर विमानतळावर दाखल झाले. विशिष्ट बॉक्समधून हे चित्ते भारतात आणले गेल. भारतातली चित्त्यांची संख्या वाढावी या अनुषंगाने दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात १२ चित्ते आणले गेले आहेत. भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर वाहतूक विमानाद्वारे दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते भारतात दाखल झालेत. या १२ चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले. हे चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना आधी क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांना मुख्य पार्क मध्ये सोडले जाईल. आता कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण २० चित्ते असणार.