मुंबई : डोंगराळ भागांमध्ये थंड वाऱ्यांमुळे तापमानातही चढ-उतार सुरू आहे. अद्याप थंडी पूर्णपणे गेलेली नाही. या आठवड्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर पाहायला मिळेल. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट नोंदवली जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हिमालयीन भागामध्ये रविवारपासून पाऊस आणि बर्फवृष्ठी सुरू आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात काही भागांमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. यामुळे याचा परिणाम राज्यातही पाहायला मिळेल. महाराष्ट्रात सध्याही औरंगाबाद, नागपूर, पुण्याचे तापमान घसरत आहे. आज औरंगाबादचे तापमान १०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. विदर्भातही थंडी कमी-जास्त होत आहे. जगभरात हवामान बदलामुळे कुठे दुष्काळ, कुठे पूर, तर कुठे थंडीच्या लाटेला सामोरे जावे लागत आहे. प्रदूषणवाढ थांबली नाही, तर येणाऱ्या काळात असे बदल वारंवार जाणवण्याची भीतीही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.