नाशिक – नाशिकच्या श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिरात जवळून देवदर्शन घेण्यासाठी देवस्थानने सशुल्क दर्शनाचा निर्णय घेतला आहे.या विश्वस्त मंडळाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तसेच हा निर्णय भक्तांमध्ये दुजाभाव करणारा आणि त्यांची लूट करणारा असल्याचा दावा करत तो रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
देवस्थानच्या माजी विश्वस्त ललित शिंदे यांनी वकील रामेश्वर गीते यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. या मंदिराला पुरातन वास्तूचा दर्जा देण्यात आला असून मंदिराची जागा ही सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे देवस्थानवर केवळ मंदिराच्या देखभालीची आणि कारभाराची जबाबदारी आहे.असे असताना देवस्थानकडून बऱ्याच पातळीवर गैरकारभार सुरू आहे. याचाच भाग म्हणून मंदिराच्या उत्तर दरवाजातून दर्शनासाठी प्रवेश देताना भक्तांकडून २०० रुपये शुल्क आकारले जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.देवदर्शन जवळून घेण्याकरिता देवस्थानने उत्तर दारातून प्रवेश देण्यासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.