मुंबई – कोरोना काळात एमएमआरडीएने विलगीकरणासाठी दिलेल्या ठाणे जिल्ह्यातील राजनोळी येथील टाटा हाऊसिंग कंपनी लिमिटेड प्रकल्पातील १२४४ घरांची प्रचंड दुरवस्था झाली आहे.मात्र हीच गिरणी कामगारांना मिळणार असून ती तशीच गिरणी कामगारांच्या माथी न मारता त्यांची आधी दुरुस्ती करावी आणि मगच आगामी घरांची सोडत काढावी अशी मागणी गिरणी कामगार कृती.समितीने केली आहे. दुरुस्तीशिवाय घरांची सोडत काढण्यास कृती समितीने विरोध केला आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना काळात विलगीकरणासाठी घेतलेली ही घरे दोन वर्षांमध्ये प्रचंड दुरावस्थेत दिसत आहेत. त्यात २ डिसेंबर २०१६ मध्ये काढण्यात आलेल्या कोन, पनवेल येथील दोन हजार ४१७ घरांचा आणि आगामी सोडतीतील दोन हजार ५२१ घरांचा समावेश आहे.गिरणी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच या घरांना भेट दिली.त्यावेळी असे निदर्शनास आले की, राजनोळी येथील १२४४ घरांच्या भिंतींचे प्लास्टर निघाले आहे.खिडक्यांची तावदाने आणि दरवाजे तुटले आहेत. या घरांमधील पंखे सुद्धा चोरीला गेले आहेत आणि याच घरांचा आगामी सोडतीतील २५२१ घरांमध्ये समावेश आहे. त्यामुळे अशा घरांची सोडत काढण्यास समितीचा विरोध आहे. या घरांची दुरुस्ती झाल्यावरच सोडत काढावी.किंवा आगामी घरांच्या सोडतीमध्ये या मोडतोड झालेल्या घरांचा समावेश करू नये असे कृती समितीचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे एमएमआरडीएने ही खराब घरे म्हाडाकडे तशीच वर्ग केली.मात्र त्यानंतर या घरांची दुरुस्ती कुणी करायची असा प्रश्न उपस्थित झाला.त्यामुळे या एमएमआरडीए आणि म्हाडा यांच्या वादात सोडत रखडली होती.पण आता मुंबई मंडळाने २५२१ घरांसाठी सोडत काढण्याची योजना आखली आहे.