नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाकडून जामीन कायम ठेवण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टाच्या जामीन निर्णयाला एनआयएने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली असून सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर तेलतुंबडे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. यावेळी त्यांनी केलेल्या याचिकेत 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात ते उपस्थित नव्हते आणि त्यांनी कोणतेही भडकाऊ भाषणही केले नव्हते, असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई हायकोर्टाकडून एक लाख रुपयांच्या जामिनावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.त्यानंतर एनआयएने मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले.एनआयएची मागणी मान्य करत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. खंडपीठाने मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणांना खटल्यातील निर्णायक निष्कर्ष मानले जाणार नाही असे सांगितले. यावेळी सुप्रीम कोर्टाने एनआयएची याचिका फेटाळत आनंद तेलतुंबडे यांचा जामीन मंजूर केला आहे.