संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

तेरा लोकांचा जीव घेणारा नरभक्षी सीटी १ वाघ अखेर जेरबंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भंडारा : तेरा लोकांचा बळी घेतलेल्या सी टी-१ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील जंगलात हा वाघ वावरत होता. सीटी १ या वाघाने वडसा वनविभागात ६, भंडारा वनविभागात ४ व ब्रम्हपुरी वनविभागात ३,असे एकुण १३ मानवी बळी घेतले होते. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांनी दिल्या होत्या.
गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सीटी १ या नरभक्षी वाघामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक उडाली होती. गेल्या ३ महिन्यांपासून ताडोबातील विशेष पथक या वाघाला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. मात्र, यात यश येत नव्हतं. आता अखेर या वाघाला गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे जेरबंद करण्यात आले आहे. या नरभक्षी वाघामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. त्यामुळे वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत होते. वनविभागाकडूनही यासाठी प्रचंड प्रयत्न सुरू होते.आज सकाळी झालेल्या या कारवाईने वनविभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या वाघाने देसाईगंज जवळच्या एका गाईवर दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्यामुळे वाघ तिथे पुन्हा येणार अशी खात्री असल्याने वनविभागाची ताडोबा येथून बोलावण्यात आलेली टीम त्याच्यावर पाळत ठेवून होती. वाघाला तिथे बोलावण्यासाठी जवळच शिकार म्हणून दुसरी एक गायही ठेवनयेत आली होती. आज सकाळी हा नरभक्षी वाघ त्या सापळ्यात अडकला. यानंतर वाघ तिथे येताच शूटर टीमने त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन डागले. या नरभक्षी वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवलं जाणार आहे. मात्र, नरभक्षी वाघाला पकडण्यात अखेर यश आल्याने परिसरात आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांनी आता सुटकेचा श्वास सोडला असला तरी, सी टी १ या वाघाला जेरबंद केले म्हणून धोका कमी झाला असे नाही. अजूनही या क्षेत्रात सि टी ६ वाघीण आहे. काही जणांवर तिनेही हल्ले केल्याचे समोर येत आहे. या वाघीणीलाही पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, गडचिरोलीतील वडसा येथेही काही वाघांचा वावर आहे. त्यामुळे स्थानिकांनी अधिक जंगलात जाऊ नये. सध्या सर्वत्र हिरवळ असल्याने हे वाघ सहज दृष्टीक्षेपात येत नाहीत. त्यामुळे ते जवळ असले तरी दिसत नाहीत. त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami